इराणने अफगाणिस्तानचे दूतावास तालिबानच्या हवाली केले

नॉर्दन रेझिस्टन्स फ्रंटची इराणवर टीका

Afghan embassy Tehranइस्लामाबाद – इराणने अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला एकप्रकारे मान्यता दिली आहे. राजधानी तेहरानमधील अफगाणिस्तानचे दूतावास इराणने तालिबानच्या स्वाधीन केले आहे. त्यामुळे १८ महिन्यानंतर इराणमधील अफगाणिस्तानच्या दूतावासात पहिल्यांदाच तालिबानचे कमांडर राजनैतिक अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारतील. इराणने उचललेले हे पाऊल म्हणजे तालिबानच्या दहशतवादी बेकायदेशीर राजवटीला मान्यता देण्याचा प्रकार असल्याची टीका नॉर्दन रेझिस्टन्स फ्रंट या अफगाणिस्तानातील प्रमुख विरोधी पक्षाने केली.

तालिबानच्या परराष्ट्र विभागाने इराणमधील या घडामोडींची माहिती जाहीर केली. काही दिवसांपूर्वी तालिबानने सात सदस्यीय पथक इराणमध्ये रवाना केले होते. राजनैतिक अनुभव असलेल्या सदस्यांचा तालिबानच्या या पथकात समावेश होता, असा दावा तालिबानने केला होता. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या सविस्तर चर्चेनंतर राजधानी तेहरानमधील अफगाणिस्तानचे दूतावास तालिबानला देण्याचे निश्चित झाले. ही एक महत्त्वाची घडामोड असून यामुळे अफगाणिस्तान आणि इराणमधील सहकार्य अधिक विकसित होईल, असे तालिबानने म्हटले आहे.

Afghan embassyअफगाणिस्तानातील आयएस व इतर दहशतवादी संघटनांचे वाढते हल्ले इराणच्या या निर्णयामागील मुख्य कारण असल्याचा दावा केला जातो. आयएसच्या दहशतवाद्यांची इराणच्या सीमेतील घुसखोरी रोखण्यासाठी इराणने तालिबानच्या दूतावासाला मान्यता दिल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. पण या एका निर्णयामुळे गेली चार दशके इराणमध्ये आश्रय घेतलेल्या अफगाणी निर्वासितांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, असा इशारा हे विश्लेषक देत आहेत.

रशिया, चीन, पाकिस्तान तसेच तुर्की, कतार, मलेशिया यांच्यासह उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, किरगिझिस्तान आणि कझाकस्तान या अफगाणिस्तानच्या शेजारी देशांनी आपल्या देशातील दूतावास तालिबानच्या हवाली केला आहे. अफगाणिस्तानचा शेजारी असलेल्या ताजिकिस्तान या एकमेव देशाने तालिबानची राजवट आपल्याला मान्य नसल्याचे ठामपणे सांगून अफगाणिस्तानचे दूतावास तालिबानच्या हवाली करण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानचे दूतावास तालिबानच्या हवाली करुन इराणने अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला अप्रत्यक्षरित्या मान्यता दिल्याचे दिसत आहे.

leave a reply