देशाच्या सीमांवर लष्करासाठी टनेल्सची निर्मिती होत आहे

- लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग

हरपाल सिंगनवी दिल्ली – देशाच्या सीमेवर लष्कराच्या शस्त्रास्त्रांचा साठा करणारे व अणुहल्ल्यालाही दाद न देणारे टनेल्स तयार केले जात आहेत. यासाठी आवश्यक असलेले अत्याधुनिक साहित्य इंजिनिअर्सना उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती लष्कराच्या ‘इंजिनिअर-इन-चीफ’ लेफ्टनंटर जनरल हरपाल सिंग यांनी दिली. सीमेवर तैनात असलेल्या लष्कराची क्षमता यामुळे प्रचंड प्रमाणात वाढेल, असा विश्‍वास लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी व्यक्त केला. एलएसीवर चीनबरोबर निर्माण झालेला तणाव व पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर, भारतीय लष्कराची ही तयारी लक्ष वेधून घेणारी ठरते.

देशाच्या सीमेवर ‘मायक्रो टनेलिंग’ अर्थात शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याचा अतिरिक्त साठा करणार्‍या व अणुहल्ल्यापासूनही सुरक्षित राहू शकणार्‍या छोट्या बोगद्यांच्या निर्मितीची वेळ आलेली आहे. याच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले प्रगत साहित्य लष्कराच्या इंजिनिअर्सना उपलब्ध करून देण्यात आले आहे. लष्कराच्या ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन-बीआरओ’मार्फत सीमाभागात उभारल्या जात असलेल्या रस्त्यांच्या जाळ्याबरोबरच या टनेल्समुळे सीमाभागातील कनेक्टिव्हीटी अधिकच वाढेल. याचा फार मोठा लाभ लष्कराला मिळेल, असा विश्‍वास लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी व्यक्त केला.

बीआरओकडून सीमाभागात तयार केल्या जात असलेल्या रस्त्यांचा लाभ स्थानिकांनाही मिळत असल्याचे सांगून यावर लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी समाधान व्यक्त केले. तर बीआरओच्या दुर्गम व प्रतिकूल भागातही रस्ते तसेच पूल उभारण्याच्या या कौशल्याचा वापर शेजारी देशांसाठीही केला जात असल्याचे सांगून याचे धोरणात्मक महत्त्व लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी अधोरेखित केले. दुर्गम भागात हे काम करणे सोपे नाही, या कामात फार मोठी आव्हाने समोर येत राहतात. पण लष्कराचे इंजिनिअर्स आपला अनुभव आणि कौशल्याचा वापर करून या आव्हानांवर मात करीत आहेत, असे सांगून लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग यांनी या इंजिनिअर्सचे कौतूक केले.

दरम्यान, एलएसीवर चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्याचवेळी पाकिस्तान एलओसीवर करीत असलेल्या कारवायांमुळे या क्षेत्रातील लष्कराची सिद्धता अधिकच महत्त्वाची बनलेली आहे. पाकिस्तानने आपल्याकडे कमी क्षमतेचे अणुबॉम्ब असल्याचे सांगून त्याचा वापर आपल्यावर कारवाई करणार्‍या भारतीय लष्कराच्या तुकड्यांवर केला जाईल, अशा धमक्या दिल्या होत्या. त्यामुळे सीमेवर अणुहल्ल्यांनाही दाद न देणार्‍या टनेल्सच्या निर्मितीसंदर्भात आलेल्या या बातमीला फार मोठे सामरिक महत्त्व असल्याचे दिसते.

leave a reply