इराणमुळे भयावह इंधन संकटाला तोंड द्यावे लागेल

- फ्रेंच-ब्रिटीश विश्लेषिकेचा इशारा

लंडन – इराणचा अणुबॉम्ब नाही तर भौगोलिक स्थान हे या देशाचे सर्वात मोठे शस्त्र आहे. अणुबॉम्ब इराणसाठी ढालीसारखा ठरेल. पण होर्मुझचे आखात आणि बाब अल-मंदाबवरील इराणचे नियंत्रण जागतिक इंधनाच्या वाहतुकीची कोंडी करणारी बाब ठरू शकते. असे झाले तर रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या आपत्तीहूनही अधिक भयावह इंधनसंकट निर्माण होऊ शकते, असा इशारा ‘कॅथरिन शकदम’ या फ्रेंच-ब्रिटीश विश्लेषिकांनी दिला. तसेच इराणचा प्रश्न युद्धाद्वारे नाही तर वाटाघाटींनी सोडविण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन कॅथरिनने केले.

गेल्या दहा महिन्यांपासून अमेरिका आणि इराणमध्ये अणुकराराबाबत सुरू असलेल्या वाटाघाटी अपयशी ठरल्याचा दावा केला जातो. अणुकरार यशस्वी करण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर आपल्या मागण्या ठेवल्या आहेत. यामध्ये इराणवरील निर्बंध पूर्णपणे मागे घेण्याबरोबरच रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सना दहशतवादी संघटनेच्या यादीतून वगळण्याच्या मुद्याचाही समावेश आहे. बायडेन प्रशासनाने इराणच्या या मागण्यांकडे पाठ फिरविल्याचे अमेरिकी माध्यमांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर इराणवरील हल्ल्यासाठी अमेरिका इस्रायलला सहाय्य पुरवित असल्याच्या बातम्या येत आहेत.

या पार्श्वभूमीवर, गेली काही वर्षे इराणमध्ये पत्रकारिता करणाऱ्या फ्रेंच-ब्रिटीश विश्लेषिका कॅथरिन शकदम यांनी अभ्यासगटासाठी लिहिलेल्या लेखात नव्या इंधनसंकटाबाबत इशारा दिला. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनसंकट निर्माण झाले आहे. यासाठी रशियाला जबाबदार धरले जात आहे. पण पाश्चिमात्य देशांनी इराणला धमकावण्याचा प्रयत्न केला तर इराण जागतिक इंधन वाहतुकीच्या दोन मोठ्या सागरीमार्गांची कोंडी करील, असे कॅथरिन यांनी बजावले. यासाठी इराणच्या भौगोलिक स्थानाकडे कॅथरिन यांनी लक्ष वेधले.

पर्शियन आखाताला हिंदी महासागराशी जोडणाऱ्या ‘होर्मुझच्या आखाता’वर इराणचे पूर्ण वर्चस्व आहे. तर हिंदी महासागरातून रेड सीला जोडणाऱ्या ‘बाब अल-मंदाब’च्या आखातावर येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोरांचे नियंत्रण आहे. त्यामुळे इंधन व व्यापारी मालाची सर्वात मोठी वाहतूक होणारे दोन्ही सागरीमार्ग इराणच्या नियंत्रणाखाली आहेत, याची जाणीव कॅथरिन यांनी करुन दिली. हे दोन्ही सागरीमार्ग चोकपॉईंट्स असल्याचा दावा कॅथरिन यांनी केला.

अशा परिस्थितीत, पाश्चिमात्य देशांनी इराणची कोंडी करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा इराण या दोन्ही चोकपॉईंट्सची कोंडी करून आपत्तीजनक इंधनसंकट निर्माण करू शकतो, असा इशारा कॅथरिन यांनी दिला. अणुबॉम्बपेक्षाही इंधनाचे संकट आपत्तीजनक ठरेल. कारण युक्रेन युद्धानंतर जग आणखी एका इंधनसंकटाचा सामना करू शकत नाही, असे कॅथरिन यांनी बजावले.

दरम्यान, कॅथरिन शकदम या गेली काही वर्षे इराणी वृत्तवाहिनीसाठी काम करीत होत्या. त्या इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या एजंट असल्याचा आरोप झाला होता. तसेच त्यांनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांचे संकेतस्थळ हॅक केल्याचे आरोप झाले होते.

leave a reply