युक्रेनमधील लष्करी मोहिमेसाठी रशियाकडून अफगाणी कमांडोज्‌‍पाठोपाठ लेबेनॉनमधील पॅलेस्टिनींची भरती

- अमेरिकी वृत्तसंस्थेचा दावा

पॅलेस्टिनींची भरतीवॉशिंग्टन/बैरुत/मॉस्को – युक्रेनमधील मोहिमेसाठी रशिया लेबेनॉनच्या छावण्यांमधील पॅलेस्टिनींची भरती करीत असल्याचा दावा अमेरिकेच्या वृत्तसंस्थेने केला आहे. लेबेनॉनमधील पॅलेस्टाईनच्या दूतावासातील सदस्य व इराणसमर्थक हिजबुल्लाह संघटनेकडून यासाठी पुढाकार घेण्यात आल्याचे अमेरिकी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. आतापर्यंत जवळपास ३००हून अधिक पॅलेस्टिनींनी रशियात जाऊन प्रशिक्षण घेतले असून त्यांची तैनातीही करण्यात येत असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले. गेल्या वर्षी, रशियातील खाजगी लष्करी कंत्राटदार असलेल्या ‘वॅग्नर ग्रुप’कडून ‘अफगाणिस्तान नॅशनल आर्मी’चा भाग असलेल्या अफगाणी कमांडोज्‌‍ची भरती करण्यात येत असल्याचे अमेरिकी माध्यमांनी म्हटले होते.

रशिया-युक्रेन युद्धात रशियन लष्कराला मोठ्या प्रमाणात जीवितहानी सहन करावी लागल्याचे दावे युक्रेनसह पाश्चिमात्य देशांकडून करण्यात येत आहेत. या जीवितहानीमुळे रशियाने लष्करात नव्या भरतीची प्रक्रिया राबविल्याचे तसेच चेचेन तुकड्या व ‘वॅग्नर ग्रुप’चा वापर वाढविल्याचेही सांगण्यात येते. गेल्या वर्षी रशियाने सिरिया व इतर देशांमध्ये तैनात केलेल्या लष्करी तुकड्यांमधून काही पथके माघारी बोलावल्याचेही समोर आले होते. या पार्श्वभूमीवर अफगाण कमांडोज्‌‍ व त्यापाठोपाठ पॅलेस्टिनींच्या भरतीचा दावा लक्ष वेधून घेणारा ठरतो. अमेरिकेतील ‘द मीडिया लाईन’ या खाजगी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात पॅलेस्टिनी तरुणांची रशियन सैन्यात भरती करण्यात येत असून त्यांना दरमहा ३५० डॉलर्स देण्यात येत असल्याचे आपल्या वृत्तात म्हटले आहे. लेबेनॉनमधील पॅलेस्टिनींची सर्वात मोठी छावणी असणाऱ्या ‘ऐन अल-खलवाह’मधील तरुणांचा यात सहभाग आहे. बहुतांश तरुण पॅलेस्टाईनमधील ‘फताह’ व ‘पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन’चे सदस्य असल्याचे सांगण्यात येते. ड्रोन्स चालविण्याचे कौशल्य व शहरी भागांमध्ये ‘गुरिला वॉरफेअर’ लढण्याची क्षमता असलेल्यांना प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती लेबेनीज्‌‍ सूत्रांकडून देण्यात आली आहे.

आतापर्यंत रशियात ३०० पॅलेस्टिनींनी प्रशिक्षण घेतले असून त्यांना युक्रेन आघाडीवर तैनात करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त ऐन अल-खलवाह’ छावणीत १०० जणांची एक तुकडी तयार असल्याचा दावाही अमेरिकी वृत्तसंस्थेने केला. पॅलेस्टिनींव्यतिरिक्त सिरियन लष्करातील जवानांनाही रशियन लष्करात सामील करून घेण्यात आल्याचे ‘द मीडिया लाईन’ने म्हटले आहे.

leave a reply