इराणने अणुप्रकल्प, शास्त्रज्ञांच्या सुरक्षेसाठी स्पेशल युनिट तयार केले

तेहरान – अणुकराराच्या जवळ पोहोचत असलेल्या इराणने आपल्या अणुप्रकल्प तसेच शास्त्रज्ञांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा तुकडी तयार केली आहे. इस्रायल किंवा इतर शत्रूंपासून इराणची संवेदनशील ठिकाणे, महत्त्वाच्या अधिकार्‍यांची सुरक्षा करणे, ही या तुकडीची जबाबदारी असेल. इस्रायलच्या हल्ल्याची शक्यता वाढल्याने, इराणला आपल्या अणुप्रकल्प तसेच इतर संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा वाढविणे आवश्यक वाटू लागल्याचे यामुळे स्पष्टपणे दिसत आहे.

iran-nuclear-scientist-fakhrizadeh गेल्या काही वर्षांमध्ये इराणचे अणुप्रकल्प व शास्त्रज्ञांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. २०१० ते २०१२ या कालावधीत इराणचे चार अणुशास्त्रज्ञ ठार झाले. यापैकी काही शास्त्रज्ञांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला, तर काही शास्त्रज्ञांना राजधानी तेहरानमध्ये गोळ्या घालून ठार करण्यात आले. इराणने आपल्या शास्त्रज्ञांवरील हल्ल्यांसाठी इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादला जबाबदार धरले आहे.

२०२० साली मोहसिन फखरीझादेह या वरिष्ठ अणुशास्त्रज्ञाच्या हत्येनंतर इराण हादरले. आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून इस्रायलने फखरीझादेह यांची हत्या घडविल्याचा आरोप इराणने केला होता. फखरीझादेह यांच्यावर अवघ्या ६० सेकंदात १५ गोळ्या घालून त्यांची निघृण हत्या केल्याचा ठपका इराणने ठेवला होता.

iran-nuclear-securityjpgतर गेल्या तीन वर्षांमध्ये इराणच्या अणुप्रकल्प व अणुकार्यक्रमाशी संबंधित ठिकाणांवरील हल्लेही वाढले आहेत. नातांझ अणुप्रकल्पात झालेल्या हल्ल्यांमध्ये इराणच्या अणुकार्यक्रमाचे जबर नुकसान झाले होते. याशिवाय इराणच्या ड्रोननिर्मिती प्रकल्पांमध्येही संशयास्पदरित्या स्फोट झाले आहेत. या स्फोटांसाठीही इराणने इस्रायलला जबाबदार धरले आहे. पण इस्रायलने इराणच्या कुठल्याही आरोपांवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

या पार्श्‍वभूमीवर, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या देखरेखीखाली ‘न्युक्लिअर फॅसिलिटीज् डिफेन्स कमांड’ची स्थापना करण्यात आल्याची माहिती इराणी माध्यमांनी दिली. इस्रायल तसेच इतर शत्रूंकडून इराणचा अणुप्रकल्प, संबंधित ठिकाणे आणि अणुशास्त्रज्ञांच्या सुरक्षेची जबाबदारी या विशेष तुकडीकडे असेल. ही तुकडी इराणच्या गुप्तचर यंत्रणेशी जोडलेली असणार आहे.

leave a reply