इराणच्या नातांझ अणुप्रकल्पात संशयास्पद ब्लॅकआऊट

- इस्रायलने सायबर हल्ला घडविल्याचा माध्यमांचा संशय

ब्लॅकआऊटतेहरान/दुबई/जेरूसलेम – इराणच्या नातांझ अणुप्रकल्पाचा वीजपुरवठा खंडीत झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. अपघातामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्याचे प्राथमिक कारण इराणने दिले आहे. याची चौकशी सुरू असल्याचेही इराणने जाहीर केले. मात्र इराणच्या अणुकार्यक्रमातील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या नातांझमधली ही घटना संशयास्पद असल्याचे दिसत आहे. इस्रायली माध्यमांनी ही बातमी उचलून धरली असून यामागे सायबर हल्ला असण्याची दाट शक्यता वर्तविली. २०१० साली याच अणुप्रकल्पावर सायबर हल्ले चढवून इस्रायल व अमेरिकेने इराणला जबरदस्त धक्का दिला होता.

ब्लॅकआऊटशनिवारी रात्री नातांझ अणुप्रकल्पातील १६४ ‘आयआर-६’ आणि ३० ‘आयआर-५’च्या सेंट्रिफ्यूजेस कॅसकेडमध्ये युरेनियम हेक्साफ्लोराईड इंजेक्ट करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी दिली. यामुळे सदर अणुप्रकल्पातील युरेनियम संवर्धनाचा वेग वाढणार असल्याचे बोलले जात होते.

याशिवाय अत्याधुनिक ‘आयआर-९’ सेंट्रिफ्यूजेसवरही प्रक्रिया सुरू केली होती. याला?काही तास उलटत नाही तोच रविवारी पहाटे या प्रक्रियेशी जोडलेले इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन नेटवर्क कोलमडले.

या घटनेमुळे जीवितहानी किंवा इतर कुठलेही नुकसान झाले नसल्याचे इराणच्या अणुऊर्जा आयोगाचे प्रवक्ते बेहरोझ कमालवंदी यांनी सांगितले. तसेच हा एक अपघात असून याची चौकशी सुरू असल्याची माहिती कमालवंदी यांनी दिली. मात्र इस्रायली माध्यमांनी नातांझ प्रकल्पातील घटनेमागे सायबर हल्ला असून हा हल्ला इस्रायलने घडविलेला असू शकतो, असा दावा केला आहे.

ब्लॅकआऊटयासाठी इस्रायली माध्यमांनी नातांझ अणुप्रकल्पावर याआधी झालेल्या सायबर हल्ल्यांची आठवण करून दिली. गेल्या वर्षी जुलै महिन्यात याच अणुप्रकल्पात संशयास्पद स्फोट झाला होता. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत सेंट्रिफ्यूजेसचे असेंबली हॉल नष्ट झाल्याची माहिती इराणच्या अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख अली अकबर सालेही यांनी काही तासांपूर्वीच दिली होती.

तर २०१० साली याच अणुप्रकल्पावर स्टक्सनेट व्हायरसचे जबरदस्त हल्ले झाले होते. या सायबर हल्ल्यात इराणच्या अणुप्रकल्पातील हजाराहून अधिक सेंट्रिफ्यूजेस नष्ट झाले होते. इस्रायल आणि अमेरिकेने मिळून स्टक्सनेटचा सायबर हल्ला घडविल्याचा आरोप इराणने केला होता.

हवाई हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी इराणचा हा प्रकल्प अंडरग्राऊंड ठेवण्यात आलेला आहे. तरी देखील सायबर हल्ल्यांमुळे नातांझ अणुप्रकल्पाचे जबरदस्त नुकसान होत असल्याचे इस्रायली माध्यमे निदर्शनास आणून देत आहेत.

दरम्यान, अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन इस्रायलच्या दौर्‍यावर आहेत. व्हिएन्ना येथे अमेरिका आणि इराणमध्ये अणुकरारावर अप्रत्यक्ष चर्चा सुरू असताना, संरक्षणमंत्री ऑस्टिन यांचा इस्रायलचा दौरा लक्षवेधी ठरतो. अमेरिका इराणबरोबर नव्याने करीत असलेल्या अणुकराराशी इस्रायल बांधिल नसेल, असे इस्रायली पंतप्रधानांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. त्यानंतर नातांझ अणुप्रकल्पात झालेल्या ब्लॅकआऊटकडे संशयाने पाहिले जात आहे.

leave a reply