पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये हजारो महिला चीनच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या

ग्वादर – चीनच्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट ऍण्ड रोड इनिशिएटिव्ह’चा भाग असणार्‍या ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’(सीपीईसी) विरोधात ग्वादरमध्ये सुरू झालेल्या आंदोलनाने आता व्यापक रुप घेतले आहे. सोमवारी ग्वादर व सभोवतालच्या परिसरातील हजारो महिला, मुले व विद्यार्थिनी निदर्शनांसाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहायला मिळाले. पाकिस्तानच्या माध्यमांनाही याची दखल घेणे भाग पडले असून चीन, पाकिस्तान सरकार व लष्कराविरोधातील असंतोष तीव्र झाल्याचे समोर येत आहे.

पाकिस्तानच्या ग्वादरमध्ये हजारो महिला चीनच्या विरोधात रस्त्यावर उतरल्यागेल्या काही आठवड्यांपासून बलोचिस्तानमधील प्रमुख बंदर असलेल्या ग्वादरमध्ये पाकिस्तान सरकार व लष्कराने लादलेल्या निर्बंधांवरून तसेच अपुर्‍या सुविधांवरून आंदोलन सुरू आहे. ‘ग्वादर को हक दो’ या नावाने सुरू झालेल्या या आंदोलनाची व्याप्ती हळुहळू वाढत असल्याचे दिसू लागले आहे. आंदोलनात राजकीय पक्ष, नागरी गट, मच्छिमार यांच्यासह सामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.

पाकिस्तानच्या लष्कराने दर १०० मीटर्सवर उभारलेल्या सुरक्षा चौक्या हटविणे, मकरानच्या किनार्‍यावरील मोठे ट्रॉलर्स काढणेे, वीज तसेच पाणीपुरवठा सुरळीत करणे यासारख्या मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहिल, असा इशारा स्थानिक नेते मौलाना हिदायत उर रेहमान यांनी दिला. सरकारने ग्वादरच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने निदर्शने करावी लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोमवारी ग्वादर तसेच मकरानसह नजिकच्या परिसरातील हजारो महिला, मुले तसेच विद्यार्थिनी आंदोलनात सहभागी झाल्याचे पहायला मिळाले. यात तुरबत, ओरमरा, जेवनी व पसनी या भागातील महिलांचा समावेश होता, अशी माहिती पाकिस्तानी माध्यमांनी दिली आहे. महिला, मुले व विद्यार्थिनींच्या गटाने अल जोहर पब्लिक स्कूलपासून शहराच्या विविध भागांमध्ये व्यापक मोर्चे काढले. यावेळी स्थानिक सरकारविरोधात तसेच विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

‘सीपीईसी व ग्वादर बंदरामुळे जर स्थानिक जनतेचे भले होणार नसेल, तर त्यांची येथे आवश्यकता नाही. आम्ही माघार घेणार नाही. पुढील काळात किनारी महामार्ग व इतर महत्त्वाचे रस्ते ब्लॉक केले जातील’, असे स्थानिक नेते मौलाना हिदायत उर रेहमान यांनी बजावले. केवळ सरकारच्या विरोधात असल्याने आंदोलकांवर भारताचे एजंट असल्याचे आरोप होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी दर्शविली.

ग्वादरमध्ये सुरू झालेले आंदोलन सीपीईसीविरोधात पाकिस्तानमधील वाढत्या असंतोषाचे प्रतीक मानले जाते. ग्वादरचा प्रकल्प हा चीनच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट ऍण्ड रोड इनिशिएटिव्हमधील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ओळखला जातो. पण या प्रकल्पामुळे पाकिस्तानात आलेल्या चिनी कंपन्या व कर्मचारी तसेच स्थानिक प्रशासनाने तैनात केलेली सुरक्षायंत्रणा याविरोधात नाराजीची भावना आहे.

leave a reply