इराण व पाकिस्तानच्या सीमेवर तणाव

- इराणमधून झालेल्या गोळीबारात पाकिस्तानी जवान ठार

गोळीबारातइस्लामाबाद/कराची – इराणच्या सीमेतून झालेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या फ्रंटिअर कॉर्प्सचा जवान ठार झाला तर एकजण जखमी झाला. इराणच्या सीमेतील दहशतवाद्यांनी हा हल्ला चढविल्याचा आरोप पाकिस्तानच्या लष्कराने केला. पाकिस्तानच्या या आरोपांवर इराणने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण आठवड्यापूर्वी इराण-पाकिस्तानच्या सीमेवर तैनात जवानांमध्ये वादावादी झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

पाकिस्तानच्या बलोचिस्तान प्रांतातील चुकाब सीमेवरील चौकीवर गोळीबार झाला. इराणच्या सिस्तान-बलोचिस्तान प्रांतातून झालेल्या या गोळीबारात मकबूल शाह नामक जवान मारला गेला. अद्याप कुठल्याही संघटनेने सीमेवरील या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पण यामागे इराणमधील दहशतवादी संघटना असल्याचा आरोप पाकिस्तानचे लष्कर करीत आहे. इराणने पाकिस्तानच्या या आरोपांना अजिबात किंमत दिलेली नाही.

इराण आणि पाकिस्तानमध्ये सुमारे ८०० किलोमीटरची सीमा आहे. बलोचिस्तानचा मोठा भूभाग इराण आणि पाकिस्तानमध्ये विभागला गेला आहे. याचा लाभ घेऊन इराणमधील दहशतवादी पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य करीत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून केला जातो. काही दिवसांपूर्वी ग्वादरमध्ये झालेल्या स्फोटाचे सूत्रधारही इराणमध्ये असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. पण पाकिस्तानच्या आरोपांमध्ये तथ्य नसून उलट पाकिस्तानच इराणच्या विरोधात आपल्या हद्दीतील दहशतवाद्यांचा वापर करीत असल्याचा ठपका इराणने ठेवला होता.

गोळीबारातअफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यापासून इराण व पाकिस्तानच्या सीमेवरील तणाव वाढला आहे. इराणच्या सीमेजवळ तैनात पाकिस्तानचे जवान अधिक आक्रमक झाल्याचा दावा केला जातो. गेल्या आठवड्यात दोन्ही देशांच्या सीमेवर तैनात जवानांमध्ये वाद झडल्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याशिवाय पाकिस्तानने इराणबरोबरची सीमाही बंद केली आहे. यामुळे व्यापारी वाहतूक बाधित झाल्याची टीका इराणमधील व्यापारीवर्ग करीत आहे.

दरम्यान, येत्या काळात पाकिस्तानचे लष्कर इराणच्या सिस्तान-बलोचिस्तानमध्ये घुसेल, असा दावा पाकिस्तानी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍याने काही महिन्यांपूर्वी केला होता. यासाठी चीनने मोठ्या प्रमाणात पैसा पुरविल्याचे सदर पाकिस्तानी अधिकार्‍याने म्हटले होते. तर चार दिवसांपूर्वी अझरबैजानच्या संसद सदस्यांनी देखील इराणमधील सिस्तान-बलोचिस्तान प्रांतावरुन धमकावले होते. इराणने अझरबैजानवर हल्ला चढविला तर पाकिस्तानचे लष्कर इराणचे शेपूट अर्थात सिस्तान-बलोचिस्तान छाटेल, अशी धमकी अझरबैजानी संसद सदस्यांनी दिली होती.

यावरुन पाकिस्तानचे लष्कर इराणच्या विरोधात कटकारस्थान आखत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. तर पाकिस्तानच्या अफगाणिस्तानातील हस्तक्षेपावर इराणने कडक शब्दात टीका करून आपला असंतोष व्यक्त केला होता.

leave a reply