निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी पोलंडने आणीबाणीची मुदत वाढविली

- बेलारुसने निर्वासितांच्या मुद्यावर होणारे आरोप फेटाळले

वॉर्सा/मिन्स्क – बेलारुसमधून येणारे निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी लागू केलेल्या आणीबाणीची मुदत वाढविण्यात येत असल्याचे पोलंडने जाहीर केले आहे. पोलंड-बेलारुस सीमाभागात असलेली आणीबाणी पुढील दोन महिन्यांकरता कायम ठेवण्याचा निर्णय पोलंडच्या सरकारने घेतला आहे. तर स्वयंसेवी संस्थांनी पोलंड जबरदस्तीने निर्वासितांना मागे लोटत असल्याचा आरोप केला आहे. तर बेलारुसने निर्वासितांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे दावे फेटाळून लावले आहेत.

निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी पोलंडने आणीबाणीची मुदत वाढविली - बेलारुसने निर्वासितांच्या मुद्यावर होणारे आरोप फेटाळलेयुरोपिय महासंघाने बेलारुसचे सर्वेसर्वा अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्यासह सरकारवर कडक निर्बंध लादले आहेत. लुकाशेन्को यांना विरोध करणार्‍या नेत्यांना काही युरोपिय देशांनी आश्रयही दिला असून बेलारुसवर दडपण टाकण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. महासंघाच्या या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी बेलारुसने निर्वासितांचा वापर सुरू केल्याचे समोर येत आहे. गेल्या दोन महिन्यात बेलारुसमधून आठ हजारांहून अधिक निर्वासितांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा दावा पोलंडने केला आहे.

या पार्श्‍वभूमीवर पोलंडने अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. अवैध निर्वासितांना रोखण्यासाठी पोलंडने यापूर्वीच सीमाभागात कुंपण उभारण्यास सुरुवात केली असून लष्करी तुकडीही तैनात केली आहे. त्यानंतर गेल्या महिन्यात पोलंड सरकारने पॉडलास्की व लुबेल्स्की या प्रांतांमध्ये आणीबाणी लागू केली होती. आता या आणीबाणीला मुदतवाढ देण्यात आली असून पुढील दोन महिन्यांकरता ती लागू राहणार आहे. मात्र या आणीबाणी व इतर कठोर उपायांवरून पोलंडविरोधातील टीकेची धार अधिकाधिक तीव्र होऊ लागली आहे.निर्वासितांचे लोंढे रोखण्यासाठी पोलंडने आणीबाणीची मुदत वाढविली - बेलारुसने निर्वासितांच्या मुद्यावर होणारे आरोप फेटाळले

आणीबाणीच्या काळात व त्यापूर्वी पोलंडमधील सुरक्षायंत्रणांनी निर्वासितांना जबरदस्तीने बेलारुसच्या सीमेत ढकलल्याचा दावा स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. गेल्या काही दिवसात जवळपास सहा निर्वासितांचा सीमाभागात मृत्यू झाल्याने स्वयंसेवी गट तसेच विरोधी पक्ष अधिकच आक्रमक झाले आहेत. ‘ऍम्नेस्टी इंटरनॅशनल’ या गटाने पोलंडच्या यंत्रणांचे वर्तन मानवताविरोधी आहे, अशी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भातील एक अहवालही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

दरम्यान, बेलारुसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी निर्वासितांच्या मुद्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. बेलारुसने कोणत्याही निर्वासितांना जबरदस्तीने युरोपियन सीमेवर धाडलेले नाही, असे लुकाशेन्को यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. उलट पोलंडच्या यंत्रणाच निर्वासितांना जबरदस्तीने बेलारुसमध्ये ढकलत आहेत, असा दावा त्यांनी केला. पोलंड व लिथुआनियाने बेलारुस रशियाच्या सहाय्याने निर्वासितांना युरोपिय सीमेत घुसवित असून हा ‘हायब्रिड वॉरफेअर’चा भाग आहे, असा आरोप केला होता.

leave a reply