ड्युरंड लाईनवर कुंपण उभारणार्‍या पाकिस्तानी जवानांना तालिबानने पिटाळले

काबुल/इस्लामाबाद – अफगाणिस्तान व पाकिस्तानधील ड्युरंड लाईनवर काटेरी कुंपण उभारणार्‍या पाकिस्तानच्या लष्कराला तालिबानने पुन्हा एकदा धमकावले. ही ड्युरंड लाईन आपल्याला अजिबात मान्य नसून पाकिस्तानच्या लष्कराने पुन्हा अफगाणिस्तानच्या हद्दीत फिरकू नये, असा इशारा तालिबानने दिला. अशाप्रकारे तालिबानने गेल्या दोन आठवड्यांमध्ये पाकिस्तानच्या लष्कराच्या जवानांना ड्युरंड लाईनवरून तीन वेळा पिटाळून लावल्याचे दिसत आहे. याचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटत असून अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्याने पाकिस्तानचे मोठे नुकसान होत असल्याची टीका पाकिस्तानी विश्‍लेषक व पत्रकार करीत आहेत.

ड्युरंड लाईनवरदोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडील निमरोझ प्रांतात पाकिस्तानी लष्कराच्या संशयास्पद हालचाली सुरू असल्याची खबर तालिबानला मिळाली होती. त्याबरोबर तालिबानच्या चार मोटारी येथील ‘चाहर बुरजाक’ जिल्ह्याच्या पाकिस्तान जवळच्या भागात दाखल झाली. अफगाणिस्तानमध्ये १५ किलोमीटरपर्यंत घुसखोरी करून पाकिस्तानचे जवान या भागात काटेरी कुंपण आणि सुरक्षाचौकी उभारण्याचा प्रयत्न करीत होते. पण तालिबानच्या वाहनांना पाहून पाकिस्तानी लष्कराने आपले काम थांबविले.

यानंतर तालिबानच्या कमांडर्सनी पाकिस्तानच्या लष्कराला पुन्हा या भागात न फिरकण्याची धमकी दिली. पुढे पाकिस्तानचे जवान कुंपणाचे सारे साहित्य तिथेच सोडून आपल्या वाहनातून पसार झाल्याचे तालिबानने सांगितले. पण तालिबानचा झेंडा असलेली वाहने पाहिल्यानंतर, पाकिस्तानच्या जवानांनी तालिबानसमोर उभे राहण्याची प्रतिक्षा न करता या भागातून पळ काढल्याचा दावाही केला जातो. याची पुष्टी होऊ शकलेली नाही. पण गेल्या दोन आठवड्यांमध्ये तालिबानने पाकिस्तानच्या लष्कराला नांगरहार, हेल्मंड आणि आत्ता निमरोझच्या सीमेवरुन माघार घेण्यास भाग पाडल्याचे पाकिस्तानी पत्रकार लक्षात आणून देत आहेत.

ड्युरंड लाईनवरपाकिस्तानच्या जीवावर अफगाणिस्तानात राजवट प्रस्थापित करणारे तालिबानी आता पाकिस्तानलाच धमकावत असल्याची टीका काही पाकिस्तानी पत्रकार करीत आहेत. तर तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, ही बाब पाकिस्तानी माध्यमे लक्षात आणून देत आहेत. नोव्हेंबर महिन्यातील संघर्षबंदीच्या काळातही पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये घट झाली नव्हती, असे एका पाकिस्तानी वर्तमानपत्राने म्हटले आहे.

दरम्यान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात २,६७० किलोमीटर इतकी सीमा आहे. १८९३ साली ब्रिटिशांनी आखलेली ड्युरंड सीमा अफगाणिस्तानला अजिबात मान्य नाही. पाकिस्तानच्या बलोचिस्तानपासून ते खैबर-पख्तूनख्वापर्यंतचा बराचसा भूभाग हा आपला असल्याचा दावा अफगाणिस्तान करीत आहे.ड्युरंड लाईनवर अफगाणिस्तानातील अस्थैर्याचा फायदा घेऊन पाकिस्तानने आमच्या भूभागाचा ताबा घेतल्याचा आरोप अफगाणी सरकारने याआधी केला होता. सध्या अफगाणिस्तानच्या सत्तेवर असलेल्या तालिबानची देखील याहून वेगळी भूमिका नाही. पाकिस्तानच्या अटकपर्यंत अफगाणिस्तानचा भूभाग असून लवकरच सर्व पश्तू समुदायाला एकत्र आणणारा हा भाग पाकिस्तानपासून स्वतंत्र केला जाईल, असे तालिबानने धमकावले होते.

ड्युरंड लाईनवर काटेरी कुंपण उभारून पाकिस्तान पश्तू जनतेची विभागणी करीत असल्याचा आरोप तालिबान करीत आहे. हे सहन केले जाणार नाही, असे इशारे तालिबानने पाकिस्तानला दिले होते. या पार्श्‍वभूमीवर, गेल्या काही दिवसातील तालिबानच्या कारवाया पाकिस्तानच्या चिंता वाढविणार्‍या ठरतात.

leave a reply