अमेरिकेच्या निर्बंधांना तोंड देण्यासाठी इराणकडून आयातीसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर

क्रिप्टोकरन्सीचा वापरतेहरान – अमेरिकेच्या निर्बंधांमुळे इराणला डॉलरमध्ये व्यवहार करणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत आपल्या आयातीसाठी इराणने क्रिप्टोकरन्सीचा वापर सुरू केला आहे. क्रिप्टोकरन्सीद्वारे इराणने एक कोटी डॉलर्स आयातीची ऑर्डर केल्याची माहिती इराणच्या उद्योग, खनिज व व्यापार विभागाचे उपमंत्री अलीरेझा पेमान-पाक यांनी दिली. इराणचा हा निर्णय अतिशय धाडसी असल्याचा दावा केला जात आहे.

इराण आपल्या अणुकार्यक्रमाचा वापर करून अण्वस्त्रनिर्मिती करीत असल्याचा आरोप अमेरिका व युरोपिय देश गेली कित्येक वर्षे करीत आहेत. इराणने हा अणुकार्यक्रम रोखावा, यासाठी अमेरिका व युरोपिय देशांनी इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादले होते. इराणच्या इंधन, बँकिंग तसेच मालवाहतूक क्षेत्राला लक्ष्य करीत अमेरिकेने निर्बंधांची कारवाई केली होती. याचा थेट परिणाम इराणच्या अर्थव्यवस्थेवर झाला तसेच इराणमध्ये प्रचंड महागाई भडकली असून याने ग्रासलेल्या जनतेने इराणच्या सरकारविरोधात जोरदार निदर्शने सुरू केली आहेत.

पाश्चिमात्य देशांनी आपल्यावरील निर्बंध मागे घ्यावे, यासाठी इराणने २०१५ साली अणुकरार केला होता. यानंतर अमेरिका व युरोपिय देशांनी इराणला निर्बंधातून सवलत दिली होती. पण इराणची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी या सवलती पुरेशा नसल्याचे सांगून काही इराणी नेत्यांनी या करारातून बाहेर पडण्याची मागणी केली होती. त्याचवेळी अमेरिकी डॉलरला पर्याय म्हणून इतर चलनात व्यवहार व व्यापार करण्याचा पर्याय या नेत्यांनी सुचविला होता. काही आठवड्यांपूर्वीच इराणने रशियाबरोबर रुबलमधून व्यापार करण्यासंबंधी चर्चा केली होती.

याबरोबरच इराणने आपली आयात व यापुढील व्यापार क्रिप्टो चलनात करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार इराणने एक कोटी डॉलर्सची पहिली आयात ऑर्डर केली असून सप्टेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत हा व्यवहार पूर्ण होईल, अशी माहिती अलीरेझा यांनी दिली. इराण देशांतर्गत क्रिप्टोची माईनिंग करीत असल्याच्या बातम्या याआधी आल्या होत्या. गेल्या वर्षी जगभरात झालेल्या एकूण क्रिप्टो माईनिंगपैकी साडेचार टक्के माईनिंग इराणमध्ये झाल्याचे अहवालातून समोर आले होते.

अमेरिका व पाश्चिमात्य देशांच्या इराणबरोबरील अणुकरारावर वाटाघाटी संपलेल्या नाही. यासंदर्भात नुकताच इराणला एक प्रस्ताव देण्यात आला होता व इराण यावर विचार करीत आहे. अशा परिस्थितीत क्रिप्टो करन्सीचा इराणने सुरू केलेला वापर ही लक्षणीय बाब ठरते. इंधनसंपन्न देशांनी डॉलरला पर्याय देणाऱ्या चलनाचा वापर करण्याच्या दिशेने टाकलेली पावलेही अमेरिका खपवून घेत नाही.

इराकचे माजी हुकूमशहा सद्दाम हुसेन यांनी आपल्या देशातील इंधनाची विक्री डॉलरऐवजी युरोमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अमेरिकेने सद्दाम यांची राजवट उलथून टाकली होती. अशा परिस्थितीत इराणने क्रिप्टो करन्सीचा वापर सुरू करून अमेरिकेला चिथावणी दिल्याचे दिसते आहे. यावर येणाऱ्या अमेरिकेच्या प्रतिक्रियेवर बरेच काही बरेच काही अवलंबून असेल.

leave a reply