‘गुआम’वरील हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिका टिनियन बेट सुसज्ज करीत आहे

- अमेरिकी माध्यमांचा दावा

टिनियन बेटवॉशिंग्टन – आपली ‘एच-6’ बॉम्बर विमाने पॅसिफिक महासागरातील अमेरिकेच्या ‘गुआम’ बेटावर मोठ्या प्रमाणात बॉम्बफेक करू शकतात, अशी धमकी चीनच्या हवाईदलाने दोन महिन्यांपूर्वी दिली होती. ही धमकी अमेरिकेने अतिशय गांभीर्याने घेतल्याचे अमेरिकन माध्यमांचे म्हणणे आहे. गुआमवर हल्ला झालाच तर चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून अमेरिका दुसऱ्या महायुद्धात वापरलेला ‘टिनियन’ बेटावरील हवाईतळ सज्ज करीत आहे. ह्या तळावर लढाऊ विमाने तैनात करून युद्धसराव करण्याची योजना अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने आखल्याचा दावा, माध्यमे करीत आहेत.

पॅसिफिक महासागरातील ‘गुआम’ बेट हे अमेरिकेसाठी सामरिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे बेट म्हणून ओळखले जाते. या बेटावर अमेरिकेचे पॅसिफिक क्षेत्रातील सर्वात मोठे असे ‘अँडरसन हवाईतळ’ आहे. ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात हवाईगस्त घालणारी अमेरिकेची ‘बी-52’ बॉम्बर विमाने याच हवाईतळावरुन उड्डाण करतात. जुलै महिन्यात गुआम बेटावर तैनात ‘बी-52’ बॉम्बर विमानांनी ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रात गस्त घातल्यानंतर चीनने आपली लढाऊ विमाने रवाना केली होती. गुआमवर अमेरिकेचा नौदलतळ देखील आहे.

टिनियन बेट

त्यामुळे ‘साऊथ चायना सी’ तसेच पॅसिफिक महासागरातील चीनच्या लष्करी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ‘गुआम’ अतिशय महत्त्वाचे बेट असल्याचा दावा केला जातो. पण सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेले गुआम बेटच नष्ट करण्याची धमकी चीनने काही महिन्यांपूर्वी दिली होती. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने तैवानला दिलेल्या भेटीनंतर संतापलेल्या चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स’ने व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यामध्ये चीनच्या ‘एच-6’ बॉम्बर्स विमानांनी गुआम बेटावरील अँडरसन हवाई तळावर हल्ले चढवून ते नष्ट केल्याचे दाखविले होते.

टिनियन बेटही चीनने अमेरिकेला दिलेली ही धमकी असल्याचे मानले जाते. त्यानंतर ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत, अमेरिकेने पर्याय म्हणून गुआम बेटापासून ईशान्येकडे 200 किलोमीटर अंतरावर असलेले ‘टिनियन’ बेट पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वापरलेली धावपट्टी वगळता, आंतरराष्ट्रीय विमानांसाठीची राखीव धावपट्टी लढाऊ विमानांसाठी वापरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

गुआम बेटावर हल्ला झालाच किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे गुआम बेट उपलब्ध होऊ शकले नाही, तर टिनियन बेटाचा वापर करण्याचे संरक्षण मंत्रालयाने सुचविल्याचे अमेरिकी माध्यमांचे म्हणणे आहे. गुआम बेटाला याआधी चक्रीवादळाचे तडाखे बसले आहेत. त्यामुळे टिनियन बेटाचा पर्याय योग्य असल्याचा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत. याशिवाय टिनियन बेटावर आण्विक हल्ल्यापासून बचावासाठी उभारलेला बंकरही असल्याचे पत्रकार लक्षात आणून देत आहेत. टिनियन बेटासाठी अमेरिकेने ‘एफ-15 इगल्स’ लढाऊ विमानांचे पथक रवाना केल्याचे अमेरिकी माध्यमांचे म्हणणे आहे.

दरम्यान, माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या या बातम्यांवर अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण टिनियन बेटासंबंधीच्या अमेरिकेच्या हालचालीमुळे या क्षेत्रातील तणाव अधिकच वाढल्याचे दिसत आहे.

leave a reply