अझरबैजानच्या सीमेवर इराणचा लष्करी सराव

- रणगाडे व लष्करी वाहनांच्या हालचालींद्वारे इशारा दिला

रणगाडेतेहरान/बाकू – इराण आणि अझरबैजानमधील तणाव वाढला आहे. इराणने शुक्रवारपासून अझरबैजानच्या सीमेजवळ मोठा युद्धसराव सुरू केला असून यामध्ये रणगाडे, लष्करी वाहनांचा समावेश आहे. इराणच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणार्‍यांसाठी हा सराव उत्तर असल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले. तसेच आपल्या सीमेजवळ इस्रायलचे अस्तित्त्व अजिबात खपवून घेणार नाही, असा इशाराही इराणने दिला. अझरबैजान आणि इस्रायलमधील सहकार्याच्या पार्श्‍वभूमीवर, इराणने हा इशारा दिल्याचे दिसत आहे.

गेल्या वर्षी अझरबैजान आणि आर्मेनियामध्ये भडकलेल्या ४४ दिवसांच्या संघर्षानंतर इराण आणि अझरबैजानमधील तणाव वाढतच चालला आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये अझरबैजानचे लष्कर इराणच्या मालवाहू ट्रक्सवर अतिरिक्त कर लादून रणगाडेलुटमार करीत असल्याचा आरोप इराणने केला होता. पण काही दिवसांपूर्वी अझरबैजानच्या लष्कराने इराणच्या ट्रकचालकांना अटक केली. इराणचे ट्रक्स बेकायदेशीररित्या आर्मेनियन भागात मालवाहतूक करीत असल्याचा ठपका अझरबैजानने केला. पण इराणने अझरबैजानच्या या आरोपांमध्ये तथ्य नसल्याची टीका केली.

यानंतर इराणने अझरबैजानच्या सीमेजवळ लष्कराची मोठी जमवाजमव केल्याच्या बातम्या व व्हिडिओ समोर येत आहेत. रणगाडे, तोफा, लष्करी वाहने, ड्रोन्स, हेलिकॉप्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर युनिट्स अझरबैजानच्या सीमेजवळ तैनात केल्याचा दावा केला जातो. अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इलहाम अलिव यांनी या लष्करी हालचालीवर टीका केली. सीमेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात सैन्यतैनाती करून इराणला नेमके काय साध्य करायचे आहे, असा सवाल अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांनी केला.

रणगाडेइराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातेबझादेह यांनी अझरबैजानच्या आक्षेपाला उत्तर दिले. इराणच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणार्‍यांना उत्तर म्हणून ईशान्य भागात सर्वात मोठ्या लष्करी सरावाचे आयोजन केल्याचे खातेबझादेह म्हणाले. ‘आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक सर्व कारवाया इराण करील. त्याचबरोबर इराणच्या सीमेजवळील इस्रायलचा वाढता प्रभाव इराण कदापि खपवून घेणार नाही’, असे खातेबझादेह यांनी ठणकावले. उघड उल्लेख टाळून इराणने अझरबैजान व इस्रायलमधील वाढत्या सहकार्याला लक्ष्य करून हा इशारा दिल्याचे दिसते.

यावर अझरबैजानच्या सरकारने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण ‘अझेरी टाईम्स’ या सरकारसंलग्न संकेतस्थळाने इराणला धमकावले. ‘इराणने अझरबैजानवर हल्ला चढविला तर त्याचे मोठे पडसाद उमटतील. क्षेत्रीय तसेच आंतरराष्ट्रीय महासत्ता या युद्धात उरतील. इराणवर हल्ला चढविण्याची अशी नामी संधी पुन्हा मिळणार नाही, हे या महासत्तांना देखील ठाऊक आहे. इराण देखील हे ओळखून आहे’, अशी धमकी अझेरी टाईम्सने दिली. अझरबैजानवरील इराणचा हल्ला तुर्कीसह इस्रायलला देखील या युद्धात खेचू शकतो, असे अझरबैजानच्या या संकेतस्थळाचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी अझरबैजानच्या संसद सदस्याने इराणने हल्ला चढविलाच तर अझरबैजानच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान इराणबरोबरील युद्धात उतरेल, असे धमकावले होते. पाकिस्तानचे लष्कर इराणमध्ये घुसेल व इराणचे शेपूट छाटेल, असे सांगून सिस्तान-बलोचिस्तान इराणपासून तोडण्याची धमकी अझरबैजानच्या संसद सदस्याने दिली होती. तर आणखी एका अझेरी संसद सदस्याने तर इराणला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकण्याची भाषा केली होती.

या धमक्यांच्या पार्श्‍वभूमीवर इराणने अझरबैजानच्या सीमेजवळ लष्करी हालचाली वाढवून युद्धसराव आयोजित केल्यामुळे या क्षेत्रातील तणाव वाढला आहे.

leave a reply