अमेरिकेच्या समर्थनाशिवाय इस्रायलने इराणच्या विरोधात कारवाई करावी

- अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ

इराणच्या विरोधात कारवाईवॉशिंग्टन – ‘अमेरिका इस्रायलच्या पाठिशी नसेल आणि इराणने इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणार्‍या कारवाया सुरू ठेवल्या तर स्वसंरक्षणासाठी इराणच्या विरोधात कारवाई करणे हे इस्रायलचे कर्तव्य ठरते’, असा सल्ला अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी दिला. गेल्या चार दिवसात इस्रायलला असा संदेश देणारे पॉम्पिओ हे अमेरिकेचे दुसरे विरोधी पक्षनेते आहेत.

आखाती मित्रदेशांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून इराणबरोबर वाटाघाटीची भूमिका स्वीकारणार्‍या बायडेन प्रशासनाबाबत अमेरिकेच्या सहकारी देशांमधील अविश्‍वास वाढत चालला आहे. इराणचा अणुकार्यक्रम धोकादायक टप्प्यावर येऊन पोहोचल्याचे इशारे दिले जात असतानाही, बायडेन प्रशासन इराणबरोबर अणुकरारावर वाटाघाटीसाठी तयार आहे. यामुळे इस्रायल, सौदी अरेबिया, युएई व इतर मित्रदेश दुखावले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून इस्रायलचे नेते इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढविण्याचे इशारे देऊन बायडेन प्रशासनाबाबत असलेली नाराजी दाखवून देत आहेत. अशा परिस्थितीत, अमेरिकेचे विरोधी पक्षनेते इस्रायलला हा महत्त्वाचा संदेश देताना दिसत आहेत.

दोन दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी देखील इस्रायलला असाच सल्ला दिला होता. इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायलने अमेरिकेवर विसंबून राहू नये, असे हॅले म्हणाल्या होत्या.

leave a reply