इराणचे युरेनियम संवर्धन अणुचर्चेसाठी मारक ठरेल

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन

वॉशिंग्टन/तेहरान – इराणने युरेनियमचे संवर्धन ६० टक्क्यांपर्यंत नेले असून हेच प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत नेण्याची क्षमता आपल्याकडे आहे, अशी घोषणा इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी केली होती. इराणबाबत उदार भूमिका स्वीकारणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही यावर चिंता व्यक्त केली. इराणचे युरेनियम संवर्धन व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या अणुचर्चेसाठी उपकारक ठरणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले. तरीही इराण या चर्चेच्या प्रक्रियेत कायम राहिल्याबद्दल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या रविवारी नातांझ अणुप्रकल्पात झालेल्या घटनेवर संतापलेले इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी युरेनियमचे संवर्धन ६० टक्क्यांपर्यंत नेणार असल्याची घोषणा केली होती. यासाठी प्रगत ‘आयआर-६’ सेंट्रिफ्यूजेस वापरणार असल्याचे रोहानी यांनी जाहीर केले. तर युरेनियमचे संवर्धन ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचा इशाराही इराणच्या राष्ट्राध्यक्षांना दिला होता.

इराणने युरेनियमचे संवर्धन ६० टक्क्यांपर्यंत नेणे म्हणजे २०१५ साली झालेल्या अणुकराराचे उघड उल्लंघन असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्षात आणून देत आहेत. सदर करारानुसार इराणने युरेनियमचे संवर्धन ३.६७ टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवणे आवश्यक होते. पण गेल्या वर्षभरात इराणने युरेनियमचे संवर्धन आणि सेंट्रिफ्यूजेस कार्यान्वित करण्याचा वेग वाढवून आखातातील तणावात नवी भर टाकल्याचा दावा केला जातो.

याच वेगाने युरेनियमचे संवर्धन सुरू राहिले तर लवकरच इराण अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या युरेनियमचे संवर्धन करील, असा इशारा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अधिकारी ओली हेनॉनिन यांनी दिला आहे. अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी युरेनियमचे संवर्धन ९० टक्क्यांपर्यंत नेण्याची आवश्यकता असल्याचा दावा शास्त्रज्ञ, विश्‍लेषक करीत आहेत. अशा परिस्थितीत हेनॉनिन यांनी दिलेला इशारा देखील चिंताजनक ठरतो.

अशा परिस्थितीत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी देखील युरेनियमचे संवर्धन ६० टक्क्यांपर्यंत नेणार्‍या इराणबाबत आपली चिंता व्यक्त केली. ‘इराणने नुकतेच उचललेले पाऊल अणुकराराच्या विरोधात जाणारे आहे. इराणच्या या भूमिकेला अमेरिकेचा पाठिंबा नाही आणि इराणचे हे पाऊल अणुचर्चेसाठी उपकारक ठरणार नाही’, असे बायडेन म्हणाले. तरी देखील इराण व्हिएन्ना येथे अप्रत्यक्ष चर्चेत प्रक्रियेत कायम राहिल्याबद्दल अमेरिका समाधानी असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी शुक्रवारी जाहीर केले. बायडेन यांनी इराणच्या अणुकराराबाबत उदार भूमिका स्वीकारली आहे.

अमेरिका, इराण आणि सुरक्षा परिषदेच्या इतर स्थायी सदस्यांच्या उपस्थितीत व्हिएन्ना येथे सुरू असलेली अप्रत्यक्ष चर्चा बाराव्या दिवशीही सुरू आहे. या चर्चेतून विशेष काही निष्पन्न झालेले नाही. इराणने अणुकार्यक्रमासंबंधीच्या सर्व हालचाली बंद करून अणुकरारात सामील व्हावे, अशी मागणी बायडेन प्रशासनाने केली आहे. तर इराणवर लादलेले सर्व निर्बंध काढले जात नाही, तोपर्यंत अमेरिकेच्या अटी मान्य केल्या जाणार नसल्याचे इराणने ठणकावून सांगितले आहे.

leave a reply