रशियाचे अमेरिकेला जशास तसे प्रत्युत्तर

मॉस्को/वॉशिंग्टन – अमेरिकेने रशियाच्या दहा राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी व ३० रशियन व्यक्ती व संस्थांवर निर्बंध लादले होते. त्याला रशियाने जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. रशियाने आपल्या देशातील १० राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केली असून अमेरिकेच्या आठ उच्चपदस्थ आजी-माजी अधिकार्‍यांना ब्लॅकलिस्ट केले आहे. रशियाची ही कारवाई दोन्ही देशांमधील तणाव वाढविणारी आहे, असे सांगून याला योग्य ते उत्तर दिले जाईल, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले आहे.

एफबीआय या तपासयंत्रणेचे प्रमुख ख्रिस्तोफर रे, होमलँड सिक्युरिटीचे अलेजँड्रो मर्योकस, ऍटर्नी जनरल मेरिक गारलँड, नॅशलन इंटेलिजन्सचे डायरेक्टर एव्रिल हाईनस्, फेडरल ब्युरो ऑफ प्रिझन विभागाचे डायरेक्टर मायकेल कार्व्हाज्ल, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या अंतर्गत धोरणाच्या सल्लागार सुसान राईस, माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचा रशियाने ब्लॅकलिस्ट केलेल्या दहाजणांमध्ये समावेश आहे. याची घोषणा करीत असताना, रशियाने अमेरिकेच्या दहा राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी केली आहे. रशियाकडून ही कारवाई अपेक्षित मानली जात होती.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाची यावर प्रतिक्रिया आली?आहे. अमेरिकेने रशियन राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी करण्याचा व रशियन व्यक्ती आणि संस्थांवर निर्बंध लादण्याचा निर्णय, रशियाच्या घातक कारवाया रोखण्यासाठी घेतला होता. रशियाच्या कारवायांना अमेरिकेने दिलेले हे यथोचित उत्तर होते. मात्र त्यावर रशियाने केलेली ही कारवाई दोन्ही देशांमधला तणाव अधिकच वाढविणारी आहे. अमेरिकेला रशियाबरोबरील तणाव वाढविण्यात स्वारस्य नाही. मात्र आपल्या विरोधातील या कारवाईला उत्तर देण्याचा अधिकार अमेरिका राखून ठेवत आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले आहे.

दरम्यान, रशियाच्या विरोधात कारवाईची घोषणा केल्यानंतर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियन राष्ट्राध्यक्षांना चर्चेचा प्रस्ताव दिला होता. मात्र रशियाने हा प्रस्ताव धुडकावून लावला. त्याच्या आधी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची खूनी अशी संभावना केली होती. त्यामुळे दोन्ही देशांमधला तणाव कमी करण्यासाठी सध्या तरी राजनैतिक स्तरावर चर्चा सुरू होणे शक्य नसल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर, रशिया हा अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे जाहीर करून टाकले होते.

रशिया हा अमेरिकेचा शत्रू तर चीन स्पर्धक देश असल्याचे बायडेन म्हणाले होते. आधीच्या ट्रम्प प्रशासनासारखे आपले प्रशासन रशियासमोर लोळण घेणार नाही, असे बायडेन यांनी बजावले होते. त्यामुळे ट्रम्प यांच्या कार्यकाळात काही प्रमाणात सुरळीत असलेले रशिया व अमेरिकेतील संबंध, बायडेन यांच्या काळात विकोपाला जातील, असे स्पष्टपणे दिसू लागले होते.

युक्रेनबाबत रशियाने अत्यंत आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. त्याचवेळी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे राजकीय विरोधक असलेल्या नॉव्हेल्नी यांच्या सुटकेची अमेरिकेने केलेली मागणी रशियाने धुडकावली आहे. यामुळे पुढच्या काळात अमेरिका व रशियामध्ये पुन्हा एकदा शीतयुद्धाच्या काळासारखे वैर प्रस्थापित झाल्याची नोंद जगभरातील विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply