‘आयएस’ने इराकमधील आत्मघाती हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली

बगदाद – गुरुवारी इराकची राजधानी बगदादमध्ये घडविलेल्या दुहेरी आत्मघाती स्फोटांची जबाबदारी ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली. इराकमधील धर्मभ्रष्टांना लक्ष्य करण्यासाठी हे स्फोट घडविल्याचे ‘आयएस’ने म्हटले आहे. बगदादमधील या आत्मघाती हल्ल्यामुळे आयएस नव्याने इराकमध्ये जम बसवू पाहत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

‘आयएस’चा प्रचार चालविणार्‍या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या माहितीत या दहशतवादी संघटनेने बगदादमधील दुहेरी आत्मघाती हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. बगदादच्या तायारान चौकात आपल्या दहशतवाद्यांनी गर्दीला लक्ष्य करण्यासाठी हे स्फोट घडविल्याचे सांगितले.

इराकमधील बहुसंख्यांकांना लक्ष्य करण्यासाठी हे हल्ले चढविल्याचा इशारा आयएसने दिला. आत्मघाती हल्लेखोरांची नावे देखील आयएसने प्रसिद्ध केली आहेत. या हल्ल्यात ३२ जणांचा बळी गेला तर ११० जण जखमी झाले होते.

आयएसच्या या इशार्‍यानंतर इराकमधील बहुसंख्यांकांमध्ये दहशत पसरली आहे. तीन वर्षानंतर आयएसने राजधानी बगदादमध्ये एवढा भीषण आत्मघाती हल्ला चढविल्याचा दावा केला जातो. याआधी २०१७ साली इराकमधून आयएसला पिटाळून लावल्याचा दावा अमेरिकेने केला होता.

त्यानंतर इराक तसेच सिरियातील आयएसच्या हल्ल्यांमध्ये घट झाली होती. याचा दाखला देऊन अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराक आणि अफगाणिस्तानातून सैन्यकपात करण्याची घोषणा केली होती.

गेल्या आठवड्यातच अमेरिकेने इराकमधील नियोजित सैन्यमाघार घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. दरम्यान, अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर ‘आयएस’ने इराकच्या राजधानीला लक्ष्य केल्याचे बोलले जाते. तेव्हा ‘आयएस’चा धोका टाळायचा असेल तर अमेरिकेने इराकमध्ये नव्याने सैन्यतैनाती करायलाच हवी, अशी आक्रमक मागणी काही विश्‍लेषक करू लागले आहेत.

leave a reply