दिल्लीतून ‘आयएस’च्या दहशतवाद्याला अटक, स्फोटके निकामी

नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पथकाने शुक्रवारी रात्री ‘आयएस’च्या दहशतवाद्याला अटक केली. स्वातंत्र्यदिनी राजधानीत मोठा हल्ला करण्याचा कट या दहशतवाद्याने आखला होता. पण दिल्लीतल्या कडक सुरक्षाव्यवस्थेमुळे त्याचा हा कट अयशस्वी ठरला. ‘आयएस’ने ‘लोन वुल्फ’ म्हणजे एकट्याने करायच्या हल्ल्यासाठी त्याला तयार केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. सदर दहशतवाद्याच्या घरातून आयईडी जप्त करुन निकामी केल्याचे, दिल्ली स्पेशल सेलचे पोलीस उपायुक्त प्रमोद सिंग कुशवारा यांनी म्हटले.

दिल्लीतून 'आयएस'च्या दहशतवाद्याला अटक, स्फोटके निकामीशुक्रवारी रात्री दिल्ली स्पेशल सेल पोलिसांनी ‘आयएस‘चा दहशतवादी ‘मोहम्मद मुस्ताकिन खान’ उर्फ ‘अबु युसूफ’ला दिल्लीतून अटक केली. अबू युसूफ मूळचा उत्तरप्रदेशचा आहे. शुक्रवारी रात्री दिल्लीच्या रिंग रोडजवळून अबू युसूफ दुचाकीवरुन जात असताना, दिल्लीच्या स्पेशल सेल पोलिसांनी त्याला रोखले. यावेळी या दहशतवाद्याने पोलिसांवर गोळीबार केला. सुरुवातीला झालेल्या चकमकीनंतर दिल्ली पोलिसांनी अबु युसूफला अटक केली. गेले वर्षभर दिल्ली पोलीस त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्याच्याकडे १५ किलोचे दोन आयईडी होते. ते निकामी करण्यासाठी ‘बॉम्ब डिस्पोझल स्क्वॉड’ला पाचारण करण्यात आले होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ही स्फोटके निकामी करण्यात आली. तसेच अबु युसूफकडून पिस्तूल्स, चार काट्रिज जप्त करण्यात आले. त्याच्या प्राथमिक चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली.

३६ वर्षाचा अबु युसूफ ‘आयएस’च्या अनेक कमांडर्सच्या संपर्कात होता. त्याने त्याच्या पत्नी आणि तीन मुलांचे पासपोर्टस् तयार केले होते. सुरुवातीला तो ‘आयएस’चा कमांडर ‘युसूफ अल हिंद’च्या संपर्कात होता. हा कमांडर सिरियाच्या कारवाईत ठार झाल्यानंतर अबु युसूफ पाकिस्तानमधल्या ‘अबु हुजेफा’च्या संपर्कात होता. तो पण अफगाणिस्तानच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला. अबु युसूफ एकट्याने दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ले घडविणार होता. पण कडक सुरक्षेमुळे त्याचा हल्ल्याचा कट उधळण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले. आता त्याला आठ दिवसांची कोठडी सुनवण्यात आली असून त्या दरम्यान होणार्‍या चौकशीत नवनवीन माहिती समोर येईल.

दरम्यान, अबु युसूफला अटक करण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये हाय-अर्लट जारी करण्यात आला. दिल्ली बॉर्डरजवळची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

leave a reply