गाझातील दहशतवादी गटांकडून इस्रायलला युद्धाची धमकी

बैरूत – ‘‘इस्रायलने ‘टार्गेटेड्‍ किलिंग्ज्’ पुन्हा सुरू केल्या तर ती युद्धाची घोषणा ठरेल. असे झाल्यास, हजारो क्षेपणास्त्रांचे हल्ले चढवून इस्रायलचे तेल अविव पेटवून देऊ’’, अशी धमकी गाझापट्टीतील दहशतवादी गटांनी दिली. गेल्या सोळा दिवसांपासून गाझातून सुरू असलेल्या रॉकेट आणि बलूनबॉम्बच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आणि संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी गाझापट्टीत टार्गेटेड्‍ किलिंग्ज् सुरू करण्याचा इशारा दिला होता. त्यावर गाझातील दहशतवादी गटांनी ही धमकी दिली आहे. दरम्यान, गाझातून होणार्‍या रॉकेट आणि बलूनबॉम्बच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलने आयर्न डोम तसेच लेझर यंत्रणेचा वापर सुरू केला आहे.

गाझातील दहशतवादी गटांकडून इस्रायलला युद्धाची धमकीगेल्या सोळा दिवसांपासून गाझापट्टीतून इस्रायलच्या सीमाभागात शंभरहून अधिक बलूनबॉम्बचे हल्ले चढविले आहेत. त्याचबरोबर हमास व इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्यांनी गेल्या दोन दिवसांपासून रॉकेट हल्ले देखील सुरू केले आहेत. यातील बलूनबॉम्बच्या हल्ल्यांमुळे इस्रायलमधील सात ठिकाणी मोठ्या आगी भडकल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नेत्यान्याहू आणि संरक्षणमंत्री गांत्झ यांनी शुक्रवारी गाझातील हमास, इस्लामिक जिहाद तसेच इतर दहशतवादी गटांना उद्देशून सज्जड इशारा दिला होता. यापुढेही हल्ले सुरू राहिले तर गाझातील दहशतवाद्यांच्या ठिकाणांपासून त्यांच्या नेत्यांनाही लक्ष्य करण्याची अर्थात टार्गेटेड्‍ किलिंग्जची मोहीम छेडू, असे इस्रायली नेत्यांनी बजावले होते. इस्रायली लष्कराच्या या कारवाईने गाझातील दहशतवादी गटांना जोरदार धक्का बसेल, असा दावा संरक्षणमंत्री गांत्झ यांनी केला होता.

गाझातील दहशतवादी गटांकडून इस्रायलला युद्धाची धमकीइस्रायली नेत्यांच्या या इशार्‍यानंतरही गाझातून रॉकेट आणि बलूनबॉम्बचे हल्ले सुरू असून इस्रायली लष्कराकडून प्रत्युत्तर दिले जात आहेत. हा संघर्ष सुरू असताना, लेबेनॉनमधील हिजबुल्लाह समर्थक ‘अल अकबर’ या वर्तमानपत्राने गाझातील दहशतवादी गटांची धमकी प्रसिद्ध केली. इस्रायली लष्कराने ‘टार्गेटेड्‍ किलिंग्ज्’द्वारे आपल्या नेत्यांची हत्या सुरू केली तर ती आपल्याविरोधातील युद्धाची घोषणा मानली जाईल. या युद्धामध्ये तेल अविव शहर हजारो क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांनी पेटवून देऊ. त्याचबरोबर इस्रायलने कधी विचारही केला नसेल एवढे जोरदार हल्ले चढवले जातील, अशी धमकी या दहशतवादी गटांनी दिल्याचे वृत्त लेबेनीज वर्तमानपत्राने जाहीर केले. पण या धमकीनंतरही इस्रायली लष्कराने गाझावरील कारवाई सुरू ठेवली असून शनिवारी हमासच्या खान युनूस आणि रफाह येथील ठिकाणांना लक्ष्य केल्याची माहिती समोर येत आहे.

६ ऑगस्टपासून गाझापट्टीतून इस्रायलवरील बलूनबॉम्बचे सत्र सुरू झाले असून या हल्ल्यांना रोखण्यासाठी इस्रायलने लेझर तर रॉकेट हल्ल्यांना रोखण्यासाठी आयर्न डोमचा वापर सुरू केला आहे. यापैकी ‘लहॅव्ह ओर’ या लेझर यंत्रणेने ९० टक्के टार्गेट यशस्वीरित्या भेदल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. इस्रायली लष्कराने आपल्या या लेझर यंत्रणेचे व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. येत्या काळात इस्रायली लष्कराकडून या लेझर यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार असून यामुळे इस्रायलला असलेला धोका कमी होईल, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

leave a reply