‘आयएसआय’शी संबंधित दहशतवादी मॉड्यूल उद्ध्वस्त

चार शार्पशूटर्सना शस्त्रास्त्रांसह अटक

नवी दिल्ली – पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’च्या पाठबळावर दहशतवादी, गुन्हेगारी टोळ्यांशी निगडित एक मॉड्यूल दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी उद्ध्वस्त केले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने चार शार्प शूटर्सना अटक केली असून त्यांच्याकडून चिनी बनावटीच्या हॅण्ड ग्रेनेडसह शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

ISI Terror moduleदिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील सेराई काले खान भागातून गेल्या महिन्याच्या अखेरीस लखविंदर सिंग याला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर गरजीत नावाच्या शार्पशूटरला काश्मिरी गेटजवळ सापळा लावून पकडण्यात आले. 13 ऑक्टोबरला ही अटक झाली. या गुरजीतच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनंतर हरमिंदर सिंग आणि सुखदेव नावाच्या आणखी दोघांना पंजाबमधील मोंगामधून ताब्यात घेण्यात आले. हे चारही जण लखबिर सिंग उर्फ लांडा याच्या गँगशी संबंधित शार्पशूटर आहेत. लखबिर सिंग हा कॅनडात राहून आपली गँग चालवतो व त्याचे खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे याआधी उघड झालेले आहे.

सिद्धु मुसेवाला या पंजाबी गायकाची हत्या घडविणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई सिंडिकेटला शस्त्र पुरविण्याचे काम लांडा आणि हरविंदर रिंडा या टोळ्यांनी केले होते. ‘आयएसआय’ पंजाबमध्ये दहशतवाद व हिंसाचारी कारवायांना पुनर्जीवन देण्यासाठी अशा गुन्हेगारी टोळ्यांचा वापर करीत असल्याचे तपासात समोर आलेले आहे. दहशतवादी संघटना, गुन्हेगारी टोळ्या आणि अमली पदार्थांच्या तस्करांचे संगनमत असून तपास यंत्रणांनी याविरोधात मोहीम उघडली आहे.

गेल्या काही दिवसात पंजाबमधील कार्यरत गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित अनेकांची धरपडक झाली आहेत. तसेच एनआयए आणि पोलिसांनी अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीतही अशाच कारवाईअंतर्गत चार जणांना झालेली अटक महत्त्वाची ठरते. त्यांच्याकडे पाच चिनी हँण्डग्रेनेड, एके-47 रायफल, एमपी-5 रायफल, चिनी बनावटीच्या दोन स्टार पिस्तूल आणि 10 काडतूसे सापडली आहेत.

तसेच पकडण्यात आलेल्या हरमिंदर सिंग आणि सुखदेवने आपल्या चौकशीत आणखी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. सीमेपलीकडून ड्रोनद्वारे शस्त्र तस्करीच्या काही घटना आपणच हाताळल्याची कबूली त्यांनी दिली आहे. तसेच पकडण्यात आलेले ग्रेनेड व पिस्तूल याच ड्रोनद्वारे झालेल्या शस्त्रतस्करीमधीलच एक असल्याचे या दोघांनी पोलिसांना सांगितले आहे. यामुळे या चार जणांची अटक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

leave a reply