गोलान टेकड्यांवरील लोकवस्ती वाढविण्याची इस्रायलची घोषणा

- खतरनाक व चिथावणीखोर निर्णय असल्याचा सिरियाचा इशारा

लोकवस्तीमेवो हमा – इस्रायलच्या नियंत्रणाखाली असलेल्या गोलान टेकड्यांच्या भागात इस्रायली निर्वासितांसाठी ७,३०० घरांचे बांधकाम करणार असल्याची घोषणा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी केली. यामुळे पुढील पाच वर्षांमध्ये गोलान टेकड्यांवरील इस्रायलींची लोकसंख्या दुप्पटीने वाढेल. यामुळे सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गोलान टेकड्यांवरील इस्रायलचा दावा अधिक मजबूत होईल, असा दावा केला जातो. यावर संतापलेल्या सिरियाने इस्रायलची ही योजना खतरनाक आणि परिस्थिती चिघळविणारी ठरेल, असा इशारा दिला आहे.

इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी रविवारी गोलान टेकड्यांवर विशेष साप्ताहिक कॅबिनेट बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी गोलानमधील विकासकामांसाठी ३१ कोटी, ७० लाख डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली. याअंतर्गत गोलान टेकड्यांच्या भागात पर्यटन, ऊर्जा, तंत्रज्ञान, औद्योगिक क्षेत्रासह इस्रायली निर्वासितांसाठी वस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

पुढील पाच वर्षांमध्ये गोलान टेकड्यांवर दोन नवी शहरे वसविण्यात येतील. यामध्ये ७,३०० वस्त्यांचे बांधकाम केले जाईल. यापैकी ३,३०० वस्त्या कात्झरिन भागात उभारल्या जातील. याविषयी माहिती देताना पंतप्रधान बेनेट यांनी गोलान टेकड्यांमधील लोकसंख्या दुप्पटीने वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. असिफ आणि मतार या दोन समुदायांमधील नागरिकांना गोलान टेकड्यांवर वसविण्यात येईल, असे पंतप्रधान बेनेट यांनी सांगितले. हा निर्णय म्हणजे महत्त्वाचा क्षण असल्याचे इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले.

‘गोलान टेकड्या या इस्रायलचा भूभाग असून १९८१ सालापासून या भागात इस्रायलचे कायदे लागू करण्यात आले आहेत’, असे सांगून पंतप्रधान बेनेट यांनी गोलानवर वस्त्यांचे बांधकाम करण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले. त्याचबरोबर २०१९ साली अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोलान टेकड्यांवरील इस्रायलचा सार्वभौम अधिकार वैध असल्याचे जाहीर केले होते, याची आठवण इस्रायलच्या पंतप्रधानांनी करुन दिली.

१९६७ साली अरब देशांबरोबर झालेल्या सहा दिवसांच्या संघर्षात इस्रायलने सिरियाच्या गोलान टेकड्यांचा अर्धा भूभाग जिंकला होता. साधारण दीड दशकानंतर इस्रायलच्या नियंत्रणाखाली आलेल्या गोलान टेकड्यांच्या भागात इस्रायली कायदे लागू करण्यात आले. सध्या गोलान टेकड्यांवर जवळपास ५० हजार इतकी लोकवस्ती असून यामध्ये २५ हजार इस्रायलींचा समावेश आहे.

गोलानपंतप्रधान बेनेट यांच्या या घोषणेबरोबर इस्रायलचा गोलान टेकड्यांवरील अधिकार आणखीन मजबूत होणार असल्याचा दावा केला जातो. तर गोलान टेकड्यांवर निर्वासितांचे बांधकाम आणि विकासकाम करून इस्रायल आपला विस्तार करण्याच्या प्रयत्नात असल्याचे काही पाश्‍चिमात्य विश्‍लषकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, सिरियातील गोलान भागात इराणचे जवान तसेच इराणसंलग्न हिजबुल्लाह व इतर दहशतवादी संघटना तळ ठोकून असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. इराण व इराणसंलग्न दहशतवादी गटांची गोलान सीमेजवळील ही तैनातील आपल्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे इस्रायलने याआधी जाहीर केले होते. तसेच कुणाच्या परवानगीची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी घातक ठरणार्‍यांवर जबरदस्त हल्ले चढविले जातील, असे इस्रायलने याआधी बजावले होते.

leave a reply