सेंकाकूच्या सुरक्षेसाठी जपानच्या नौदलाचा सराव

टोकिओ – येत्या काळात चीनने सेंकाकू बेटावर ताबा घेण्याचा प्रयत्न केलाच तर आपल्या या बेटांच्या सुरक्षेची तयारी म्हणून जपानच्या नौदलाने सराव आयोजित केला. दोन दिवसांपूर्वी चीनच्या विमानवाहू युद्धनौकेने जपानच्या मियाकोच्या आखातातून प्रवास केला. अशा परिस्थितीत, जपानने सेंकाकूच्या सुरक्षेसाठी आयोजित केलेल्या सरावाची माहिती उघड करून चीनला इशारा दिल्याचे दिसत आहे.

सेंकाकूच्या सुरक्षेसाठी जपानच्या नौदलाचा सरावजपानच्या सरकारी सूत्रांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना सेंकाकू बेटांच्या सुरक्षेसंबंधीच्या सरावाची माहिती उघड केली. हा सराव गेल्या महिन्यात, २० नोव्हेंबर रोजी पार पडला होता. दोन दिवसांच्या या सरावात जपानच्या नौदलाच्या विनाशिका तसेच तटरक्षकदलाच्या गस्तीनौका सहभागी झाल्या होत्या. सेंकाकू बेटांच्या क्षेत्रात परदेशी विनाशिकांनी घुसखोरी केल्यास, त्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे, याचा सराव करण्यात आला.

जपानच्या सरकारी सूत्रांनी चीनचा उल्लेख करण्याचे टाळले. पण हा सराव चीनचा धोका ओळखून केल्याचे उघड आहे. सेंकाकू बेटांवर जपानचे प्रशासन आहे. पण चीन या बेटाचा उल्लेख दियोवू करून यावर आपला अधिकार सांगत आहे. यासाठी चीनने सेंकाकू बेटांच्या हद्दीत विनाशिका तसेच गस्तीनौका रवाना केल्या होत्या. सेंकाकूच्या सुरक्षेसाठी जपानच्या नौदलाचा सरावकाही वर्षांपूर्वी चीनच्या नागरिकांनी सेंकाकू बेटांवर उतरून झेंडा फडकविण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी अमेरिका व युरोपिय मित्रदेशांनी जपानचे समर्थन केले होते.

गेल्या काही दिवसांपासून जपानने आपले लष्करी धोरण आक्रमक केले आहे. जपानची सुरक्षा ही तैवानच्या सुरक्षेवर अवलंबून असल्याचे जपानचे नेते ओरडून सांगत आहेत. तर चीनने तैवानवर हल्ला चढविला तर तो चीनसाठी आत्मघात ठरेल, असे जपानचे माजी पंतप्रधान ऍबे शिंजो बजावून सांगत आहेत. तर काही दिवसांपूर्वी जपानने चीनचा धोका अधोरेखित करून आपल्या संरक्षणखर्चात वाढ केली होती. दरम्यान, गेल्या महिन्यात सेंकाकूच्या सुरक्षेसाठी पार पडलेल्या सरावाची माहिती आत्ता उघड करून जपान चीनला इशारा देत असल्याचा दावा केला जातो. चीनची विमानवाहू युद्धनौका आपल्या ताफ्यासह सध्या इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सफरीवर आहे. दोन दिवसांपूर्वी या युद्धनौकेने जपानच्या ओकिनावा बेटांजवळील मियाकोच्या आखातातून प्रवास करून जपानला इशारा दिल्याचे लष्करी विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, जपानने आपल्या महिन्याभरापूर्वीच्या सरावाची माहिती जाहीर केल्याचे विश्‍लेषक लक्षात आणून देत आहेत.

leave a reply