सिरियाच्या लताकिया बंदरावर इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले

- सिरियन माध्यमांचा आरोप

क्षेपणास्त्र हल्लेदमास्कस – सिरियाच्या पश्‍चिमेकडील लताकिया बंदरावर मंगळवारी पहाटे जोरदार क्षेपणास्त्र हल्ले झाले. यामध्ये बंदरातील गोदामाचे मोठे नुकसान झाले असून इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हा हल्ला चढविल्याचा आरोप सिरियन माध्यमे करीत आहेत. लताकिया बंदरातील इराणच्या शस्त्रास्त्रांच्या कोठाराला इस्रायलने लक्ष्य केल्याचे दावे केले जातात. महिन्याभरात इस्रायलने लताकिया बंदरावर चढविलेला हा दुसरा हल्ला ठरतो.

सिरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने लष्करी अधिकार्‍याच्या हवाल्याने लताकिया बंदरातील हल्ल्याची माहिती दिली. मंगळवारी पहाटे ३.२१ मिनिटांनी लताकिया बंदरावर क्षेपणास्त्र हल्ले झाले. एका ठिकाणी साठविलेल्या कंटेनर्सना या क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. यामुळे बराच काळ सदर भागात आग भडकली होती. या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही. पण इथे असलेल्या लष्करी साहित्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. सिरियाच्या लष्करी अधिकार्‍याने ही माहिती दिली.

क्षेपणास्त्र हल्ले

इस्रायलच्या लष्कराने आपल्या धोरणानुसार, सिरियन वृत्तवाहिनीने केलेल्या या आरोपांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, ७ डिसेंबर रोजी लताकिय बंदरावर हवाई हल्ले झाले होते. येथील कंटेनर टर्मिनलवर झालेल्या हल्ल्यांमुळे इराणचा शस्त्रसाठा नष्ट झाल्याचा दावा सिरियातील मानवाधिकार संघटनेने केला होता. सिरियन वृत्तवाहिनीने या हल्ल्यांसाठी देखील इस्रायलला जबाबदार धरले होते. यानंतर इराणने इस्रायलवर हल्ले चढविण्याची धमकी दिली होती.

क्षेपणास्त्र हल्लेगेल्या काही वर्षांमध्ये इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हल्ले चढवून इराण व हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केले होते. वर्षभरापूर्वी इस्रायलचे तत्कालिन पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. पण आत्तापर्यंत इस्रायलने लताकिया बंदरावर हल्ले चढविण्याचे टाळले होते. कारण लताकिया बंदरापासून ८० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या तार्तूस इथे रशियाचा नौदल तळ आहे. याचा फायदा घेऊन इराणने लताकिया बंदरातच शस्त्रास्त्रांचा साठा करून ठेवला होता.

मात्र गेल्या काही आठवड्यांमध्ये इस्रायलने लताकिया बंदरातील इराणच्या कोठाराला लक्ष्य करून इराणला इशारा दिल्याचे दिसत आहे. लताकिया बंदराचा वापर करून इराण सिरियामध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी करीत असल्याचे दावे केले जातात. इराण ही शस्त्रास्त्रे लेबेनॉनमधील हिजबुल्लाहला इस्रायलविरोधात सज्ज करण्यासाठी पुरवित असून यांचा वापर करून हिजबुल्लाह इस्रायलवर हल्ला चढविण्याची तयारी करीत असल्याचे आरोप इस्रायलने याआधी अनेकवार केले होते.

leave a reply