गोलान टेकड्यांमध्ये ‘ट्रम्प हाईटस्च्या’ उभारणीला इस्रायलची मंजुरी

Golan-hillsजेरुसलेम – १९६७ सालच्या युद्धात इस्रायलने ताब्यात घेतलेल्या सीरियाच्या गोलान टेकड्यांच्या भूभागावर ‘ट्रम्प हाईटस्’ उभारण्याची घोषणा इस्रायलने केली आहे. या प्रस्तावाला इस्रायलच्या मंत्रीमंडळाने नुकतीच मंजुरी दिली. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलचा गोलान टेकड्यांवरील ताबा अवैध असल्याचे जाहीर केले होते. मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेची ही भूमिका बदलून गेल्यावर्षी इस्रायलच्या गोलान टेकड्यांवरील ताब्याला अधिकृतता बहाल केली. यासाठी इस्रायल इथे करीत असलेल्या बांधकामाला ‘ट्रम्प हाईटस्’असे नाव देण्यात आले आहे.

गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी अमेरिकेचा दौरा केला होता. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गोलान टेकड्यांवरील इस्रायलचा ताबा वैध असल्याचे सांगून त्याला मान्यता दिली होती. त्यांच्या या निर्णयाचे आखाती क्षेत्रात मोठे पडसाद उमटले होते. सिरिया, इराण तसेच इतर देशांनीही त्याला कडाडून विरोध केला होता. मात्र इस्रायलने याचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर आता इस्रायलने गोलान टेकड्यांच्या भागांमध्ये करीत असलेल्या बांधकामाला ‘ट्रम्प हाईटस्’असे नाव दिले आहे. या ठिकाणी इस्रायल आपल्या नागरिकांच्या वस्त्या उभारीत असून यासाठी २३ लाख अमेरिकन डॉलर्स इतकी गुंतवणूक केली जाणार आहे. १९६७ साली पेटलेल्या अरब-इस्रायल युद्धात इस्रायलने गोलान टेकड्यांचा भूभाग सिरियाकडून जिंकला होता. मात्र इथल्या इस्रायलच्या ताब्याला आंतरराष्ट्रीय समुदायाने अनधिकृत ठरविले होते. पण १९८१ साली इस्रायलने हा आपलाच भूभाग असल्याचे जाहीर करुन टाकले.

Golan-hills-Israelहा भूभाग आपण आज ना उद्या इस्रायलकडून घेऊ, अशी सिरियाची भूमिका आहे. सिरियामध्ये गृहयुद्ध सुरु झाल्यानंतर गोलान टेकड्यांच्या भूभागाचा वापर करुन इस्रायल सिरियन बंडखोरांना बळ पुरवित असल्याचा आरोप सिरियाच्या अस्साद राजवटीकडून केला जात आहे. तर सिरियन लष्कर तसेच इराणसमर्थक असलेल्या हिजबुलचे दहशतवादी गोलान टेकड्यांजवळील भूभागात कारवाया करीत असल्याचा आरोप इस्रायलकडून केला जातो. इथल्या सीमाभागात सिरियन लष्कर, हिजबुलचे दहशतवादी आणि इस्रायली लष्करांमध्ये चकमकी घडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यानंतर इस्रायलने या भागातील लष्करी तैनाती अधिकच वाढविली होती. या पार्श्वभूमीवर इस्रायलचे गोलान टेकड्यांच्या भागातील बांधकाम व त्याला देण्यात आलेले ‘ट्रम्प हाईटस्’ हे नाव ही वादग्रस्त घटना ठरु शकते. याआधी बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदी असताना त्यांनी इस्रायल-पॅलेस्टाइन तसेच अरब-इस्रायल वाद सोडविण्यासाठी इस्रायलने १९६७ सालच्या आधीच्या सीमेवर समाधान मानून तडजोड करावी, असा प्रस्ताव दिला होता. पण इस्रायलने हा प्रस्ताव धुडकावला होता. १९६७ सालची आणि आताची परिस्थिती वेगळी असल्याचे सांगून इस्रायलने बराक ओबामा यांना हा प्रस्ताव इस्रायलविरोधी असल्याचे सुनावले होते. पण ओबामा यांच्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलबाबतची भूमिका पूर्णपणे बदलली आहे. गोलान टेकडयांच्या भूभागात इस्रायल उभी करीत असलेली ‘ट्रम्प हाईटस्’ याचीच साक्ष देत आहे.

leave a reply