लॉकडाऊननंतरही चीनच्या शांघायमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ

- २४ तासांमध्ये २७ हजार रुग्ण आढळले

शांघायमधील कोरोनाशांघाय – चीनसह आशिया खंडातील प्रमुख आर्थिक व व्यापारी केंद्र असणार्‍या शांघायमधील लॉकडाऊन सपशेल अपयशी ठरल्याचे समोर आले आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळ लादलेल्या लॉकडाऊननंतरही शांघायमधील कोरोना रुग्णांची संख्या विक्रमी वेगाने वाढताना दिसत आहे. गुुरवारी २४ तासांमध्ये २७ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या वाढत असतानाच स्थानिक जनतेतील असंतोषही वाढत आहे. पुरेसे अन्नधान्य उपलब्ध होत नसल्याने नागरिक घराच्या गॅलरीत उभे राहून ‘हेल्प’, ‘हेल्प’ असे ओरडत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.

गेल्या काही महिन्यात चीनच्या विविध प्रांतांसह आघाडीच्या शहरांमध्ये कोरोनाचे वारंवार उद्रेक होत शांघायमधील कोरोनाअसल्याचे समोर आले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून चीनच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखण्यात येणार्‍या शांघायमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन जाहीर करून हे निर्बंध ५ एप्रिलपर्यंत असतील, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र हा लॉकडाऊन अपयशी ठरला. गेल्या आठवड्यातच शांघायमधील रुग्णसंख्येने २० हजारांचा टप्पा गाठला होता.

या आठवड्यातही रुग्णसंख्येतील वाढ कायम राहिली आहे. गुरुवारी शांघायमध्ये २७ हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य यंत्रणांनी दिली. मोठ्या प्रमाणात होणार्‍या चाचण्यांचा बॅकलॉग राहिल्याने रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे, असा खुलासा चिनी अधिकार्‍यांनी केला आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसर्‍या बाजूला शांघायमधील जनतेतील वैफल्य, नाराजी व असंतोषही ऐरणीवर येण्यास सुरुवात झाली आहे.

शांघायमधील कोरोनाचीनच्या सोशल मीडिया ऍप्सवर विविध व्हिडिओज् प्रसिद्ध झाले आहेत. त्यात अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध न झाल्याने वैफल्यग्रस्त झालेले लोक इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करीत असल्याचे दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये शांघायमधील नागरिकांच्या गटाने सुपरमार्केट लुटल्याचे दाखविण्यात आले आहे. अन्नधान्य मिळत नसल्याने नागरिक गॅलरीत उभे राहून हेल्प, हेल्प असे ओरडत असल्याचेही काही व्हिडिओंमध्ये दिसत आहे. सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या एका नेत्याच्या भेटीदरम्यानही नागरिकांनी आरडाओरड केल्याचे समोर आले आहे. शांघायबरोबरच लॉकडाऊन असणार्‍या इतर शहरांमध्येही अशाच स्वरुपाच्या घटना घडल्याचे दावे करण्यात येत आहेत.

चीनच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या व्हिडिओज्मुळे सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीची डोकेदुखी वाढल्याचे सांगण्यात येते. शांघाय व इतर शहरांमधील लॉकडाऊनमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला फटके बसण्यास सुरुवात झाली असून पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे विकासदरात मोठी घसरण होण्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply