इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायल-ब्रिटन सहकार्य भक्कम करणार

- उभय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची घोषणा

इस्रायल-ब्रिटनलंडन – ‘इराणला अण्वस्त्रसज्जेपासून रोखण्यासाठी ब्रिटन आणि इस्रायल अहोरात्र प्रयत्न करावे लागतील. कारण वेळ हातातून निघत चालली आहे. अशा काळात इराणची महत्त्वाकांक्षा धुळीस मिळविण्यासाठी सहकारी आणि मित्रदेशांमध्ये घनिष्ठ सहकार्य प्रस्थापित करणे आवश्यक आहे’, अशी घोषणा इस्रायल व ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली. व्हिएन्ना येथे इराणबरोबरच्या वाटाघाटी सुरू होण्यासाठी काही तास शिल्लक असताना इस्रायल व ब्रिटनची ही घोषणा लक्षवेधी ठरते.

जुलै महिन्यांपासून रखडलेल्या अणुकराराबाबतच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी अमेरिका, युरोपिय महासंघ आणि इराणचे प्रतिनिधी व्हिएन्ना येथे एकत्र आले आहेत. या बैठकीत सहभागी होण्याआधी इराणने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिका व युरोपिय महासंघाला आवश्यक असलेल्या या वाटाघाटींमध्ये अणुकार्यक्रमावर चर्चा होणार नाही. तर गेल्या दोन वर्षात इराणवर लादलेले निर्बंध मागे घेऊन अमेरिकेने या करारात सहभागी व्हावे, या मुद्यांवरच चर्चा होईल, असे इराणने ठणकावले होते.

इस्रायल-ब्रिटनअमेरिकेचे बायडेन प्रशासन देखील इराणच्या मागण्या मान्य करणार असल्याची शक्यता इस्रायली माध्यमे वर्तवित आहेत. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी रविवारी कॅबिनेटच्या बैठकीत बोलताना, अमेरिका इराणला निर्बंधातून मुक्त करील. त्याचबरोबर इराणच्या अणुकार्यक्रमावर मर्यादा टाकण्यात अमेरिका अपयशी ठरेल, अशी चिंता पंतप्रधान बेनेट यांनी व्यक्त केली होती. इस्रायली तसेच आंतरराष्ट्रीय माध्यमांनी पंतप्रधान बेनेट यांच्या दाव्याला मोठी प्रसिद्धी दिली होती.

अशा परिस्थितीत, इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड हे दोन दिवसांच्या ब्रिटन व फ्रान्सच्या दौर्‍यावर आहेत. ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रूझ यांच्याबरोबर भेट घेऊन इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावेळी व्यापार, संरक्षण तसेच सायबर सुरक्षेसंदर्भात सामंजस्य करार केले. यामुळे इस्रायल व ब्रिटन सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात घनिष्ठ सहकारी देश बनल्याचा दावा ब्रिटिश माध्यमे करीत आहेत. यानंतर लॅपिड आणि ट्रूझ यांनी ब्रिटीश दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत चिंता व्यक्त केली.

इराण धोकादायकरित्या अण्वस्त्रसज्जतेकडे पोहोचत असल्याचा दावा लॅपिड आणि ट्रूझ यांनी केला. इराण वेगाने अण्वस्त्रसज्जतेकडे सरकत असल्याची चिंता उभय देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली. तसेच इराणला अण्वस्त्रसज्जेपासून रोखण्यासाठी ब्रिटन व इस्रायलमध्ये भक्कम सहकार्याची आवश्यकता असल्याचे दोन्ही नेत्यांनी म्हटले. यावेळी गाझापट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेवरही दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांनी लक्ष वेधले. ‘इस्रायलद्वेषाला जगात अजिबात थारा असू शकत नाही. म्हणूनच इस्रायलच्या विनाशाच्या घोषणा करणार्‍या आणि सुरक्षेला धोका ठरणार्‍या हमासवर पूर्ण बंदी टाकण्याचा ब्रिटनने निर्णय घेतला आहे’, असे परराष्ट्रमंत्री ट्रूझ यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर इस्रायल आणि ब्रिटनमधील सहकार्याकडेही लॅपिड व ट्रूझ यांनी लक्ष वेधले. ‘योग्य दृष्टीकोन ठेवला तर स्वातंत्र्य, लोकशाहीचा दुष्ट शक्तींवर विजय होईल. ब्रिटन आणि इस्रायल एकत्र आल्यास उभय देशांच्या सुरक्षा आणि समृद्धीत वाढ होईल’, असा दावा दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांनी केला.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी घेतलेल्या भूमिकेवर इस्रायलने आपली नाराजी व्यक्त केली होती. व्हिएन्ना येथील बैठकीत अणुकरार झाला तरी इस्रायल त्याच्याशी बांधिल नसेल व इराणच्या अणुकार्यक्रमावर हल्ले केले जातील, असा इशारा इस्रायलने दिला होता. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या विरोधकांनी देखील इस्रायलच्या इराणवरील कारवाईला समर्थन दिले होते. इराणवरील लष्करी कारवाईसाठी इस्रायलने अमेरिकेच्या परवानगीची प्रतिक्षा करण्याची आवश्यकता नसल्याचे अमेरिकेच्या विरोधी पक्षनेत्यांनी म्हटले होते.

leave a reply