कोरोना व्हायरसवर उत्कृष्ट लस शोधल्याचा इस्रायलचा दावा

जेरुसलेम – कोरोना व्हायरसवर उत्कृष्ट लस शोधल्याचा दावा इस्रायलने केला आहे. ऑक्टोबर महिन्यापासून या लसीच्या मानवी चाचण्या सुरु होतील, असे इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ म्हणाले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी याचे स्वागत केले असून या आनंदाच्या बातमीने उत्साह वाढल्याचे सांगून त्यावर समाधान व्यक्त केले. याआधी इस्रायलने कोरोना व्हायरसची ‘अँटीबॉडी’ विकसित केल्याचा दावा केला होता.

कोरोना व्हायरसवर उत्कृष्ट लस शोधल्याचा इस्रायलचा दावाफेब्रुवारी महिन्यात कोरोना व्हायरसची साथ वेगाने पसरल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी ‘इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिर्सच'(आयआयबीआर) या संरक्षणक्षेत्रातील संस्थेला कोरोना व्हायरसची लस विकसित करण्याचे आदेश दिले होते. इस्रायलचे आरोग्य मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाच्या निरीक्षणाखाली ‘आयआयबीआर’चे संशोधक लस विकसित करण्याच्या कामाला लागले. सहा महिन्यात कोरोना व्हायरसची लस विकसित झाली असून ही लस जबरदस्त असल्याचा दावा ‘आयआयबीआर’चे प्रोफेसर शम्युल शापरिया यांनी केला. तसेच ही लस कोरोनाव्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी फायदेशीर ठरेल, असेही शापरिया पुढे म्हणाले.

गुरुवारी इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी ‘आयआयबीआर’ इन्स्टिट्यूटला भेट देऊन लस संशोधनाची पाहणी केली. तसेच संरक्षणमंत्र्यांनी शापरिया यांच्याशी चर्चा केली. ‘आमच्या हातात उत्कृष्ट लस आहे. ही या लसीची पहिली बॉटल आहे’, असे शापरिया यांनी संरक्षणमंत्री गांत्झ यांना सांगितले. त्याच्या काही प्रक्रिया बाकी आहेत. त्या पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात मानवी चाचण्या सुरु होतील, असा विश्वास गांत्झ यांनी व्यक्त केला.

कोरोना व्हायरसवर उत्कृष्ट लस शोधल्याचा इस्रायलचा दावापंतप्रधान नेत्यानाहू यांनी देखील ‘आयआयबीआर’च्या संशोधकांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून चर्चा केली. कोरोनाव्हायरसच्या लस संशोधनाचा आढावा घेतला. कोरोना व्हायरसची लस विकसित झाल्याचे सांगून नेत्यानाहू यांनी संशोधक आणि टीमचे आभार मानले. तीन टप्प्यात या लसीच्या मानवी चाचण्या पार पडतील. पहिला टप्प्यात १००, दुसऱ्या टप्प्यात १,००० आणि तिसऱ्या टप्प्यात ३०,०००जणांवर प्रयोग होईल. या वर्षाच्या अखेरपर्यंत दोन टप्पे पार पडतील. २०२१ सालच्या तिमाहीनंतर ही लस उपलब्ध होईल, असे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी म्हटले. याआधी इस्रायलच्या याच संस्थेने कोरोनाव्हायरसची ‘अँटीबॉडी’ विकसित केल्याचा दावा केला होता. ही अँटीबॉडी विषाणूवर हल्ला करुन आजारी व्यक्तीच्या शरीरातील विषाणू पूर्णतः निष्प्रभ करुन टाकते.

दरम्यान, भारत आणि इस्रायलने संयुक्तरीत्या कोरोना व्हायरसच्या रॅपिड टेस्टिंग किट्सवर संशोधन सुरु केले आहे. यासाठी इस्रायलचे पथक भारतात दाखल झाले होते. त्यांनी भारतातल्या २० हजार कोरोना रुग्णांचे नमुने नेले आहेत. या संशोधनात यश मिळाल्यानंतर १० सेंकदात कोरोना व्हायरसचे निदान होऊ शकते. लवकरच याचे निकाल येतील आणि गुड न्यूज मिळेल, असा विश्वास इस्रायलने व्यक्त केला आहे.

leave a reply