सिरियामध्ये मर्यादा ओलांडल्यास इस्रायलला इराणचे कठोर प्रत्युत्तर मिळेल

-इराणची धमकी

कठोर प्रत्युत्तरतेहरान – ‘‘इस्रायलने सिरियामध्ये ‘मर्यादा’ ओलांडली तर इराण त्याला कठोर प्रत्युत्तर देईल. यानंतर इस्रायलला आपल्या या कृत्याचा पश्‍चाताप झाल्यावाचून राहणार नाही’’, अशी धमकी इराणने दिली आहे. सिरियातील इराणचे तळ व इराणसंलग्न संघटनांवर इस्रायल सातत्याने हवाई हल्ले चढवित आहे. या हल्ल्याची तीव्रता वाढत चालल्याचे दिसू लागले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर, इराणच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकार्‍यांनी इस्रायलला हा इशारा दिल्याचे दिसते.

इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचे वरिष्ठ सल्लागार अली असघर खाजी यांनी इस्रायलला ही धमकी दिली. सिरियामध्ये इराणचा लष्करी प्रभाव वाढत आहे आणि ही बाब इस्रायलच्या सुरक्षेसाठी घातक ठरते. इस्रायल ते कधीही खपवून घेणार नाही, असे जाहीर करून इस्रायलने सिरियात हवाई हल्ल्यांचे सत्र सुरू केले होते. गेल्या काही आठवड्यांपासून इस्रायलच्या या हल्ल्यांची तीव्रता वाढत चालल्याचे संकेत मिळत आहेत. या हल्ल्यावर इस्रायलकडून अधिकृत पातळीवर प्रतिक्रिया दिली जात नाही. मात्र सिरियामधील इराणच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात असल्याचे इस्रायलचे नेते मान्य करीत आले आहेत.

कठोर प्रत्युत्तरत्या पार्श्‍वभूमीवर, अली असघर खाजी यांनी इस्रायलला इशारा दिला. सिरियन सरकारने अधिकृत पातळीवरून केलेल्या विनंतीमुळे इराणने सिरियात लष्करी हस्तक्षेप केलेला आहे. सिरियातील ‘आयएस’ व इतर दहशतवादी संघटनांशी इराण लढत आहे. अशा परिस्थितीत सिरियात हल्ले चढवून इस्रायलने मर्यादा ओलांडली, तर त्यावर इराणकडून अत्यंत कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. हे प्रत्युत्तर इस्रायलला आपल्या कारवायांवर पश्‍चाताप करायला लावल्यावाचून राहणार नाही, असे खाजी यांनी बजावले आहे.

एका रशियन वृत्तसंस्थेशी बोलताना खाजी यांनी हा इशारा दिला. रशियाने देखील सिरियातील इस्रायलच्या हल्ल्यांवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. सिरियातील घडामोडींमुळे आपल्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे इस्रायलला वाटत असेल, तर इस्रायलने त्वरित त्याची माहिती रशियाला पुरवावी. रशिया या धोक्याचे निवारण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलेल, अशी ग्वाही रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी दिली होती. मात्र इस्रायलने त्याकडे लक्ष दिलेले नाही.

सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बाशर अल अस्साद यांची राजवट उलथण्यासाठी सुरू झालेल्या गृहयुद्धाचा लाभ घेऊन इराण सिरियामधील आपला प्रभाव वाढवित आहे, असा आरोप इस्रायलने केला होता. सिरियात तैनात करण्यात आलेल्या इराणी लष्कर तसेच इराणसंलग्न हिजबुल्लाह संघटनेच्या सदस्यांमुळे इस्रायलच्या सुरक्षेला गंभीर धोका संभवतो. इस्रायलवर हल्ले चढविण्यासाठी सिरियात शस्त्रास्त्रांचा साठा केला जात आहे. विशेषतः गोलान टेकड्यांजवळीस सीमाभागात हिजबुल्लाहच्या हालचाली चिंताजनकरित्या वाढलेल्या आहेत, असे आरोप इस्रायलने केले होते. त्यामुळे इस्रायल आपल्या सुरक्षेसाठी सिरियामध्ये हवाई हल्ले चढवित राहणारच, असे इस्रायली नेत्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले होते. मात्र या हल्ल्यांचे तपशील इस्रायलकडून उघड केले जात नाहीत. तसेच त्याच्या बातम्यांवरही इस्रायलकडून अधिकृत पातळीवर प्रतिक्रिया नोंदविली जात नाही.

leave a reply