इराकमध्ये ‘पीकेके’ने तुर्कीच्या १३ नागरिकांची हत्या केली

- तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांचा आरोप

‘पीकेके’इस्तंबूल – इराकमधील ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी’ (पीकेके) या कुर्दांच्या संघटनेने आपल्या १३ नागरिकांना ठार केल्याचा आरोप तुर्कीने लगावला आहे. तुर्कीचे लष्कर उत्तर इराकमध्ये कारवाई करीत असताना या नागरिकांचे मृतदेह सापडल्याची माहिती तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांनी दिली. आपल्या लष्कराने बुधवारपासून उत्तर इराकमध्ये हाती घेतलेल्या लष्करी मोहिमेत ‘पीकेके’च्या ४८ जणांना ठार केल्याचे व यात आपले तीन जवान कामी आल्याचे तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. मात्र ‘पीकेके’ने संघर्षात ठार झालेले १३ जण नागरिक नसून ते तुर्कीचे जवान, पोलीस व हेर असल्याचा दावा केला आहे. या संघर्षानंतर तुर्की आणि कुर्दांची संघटना असलेल्या पीकेकेमधील संघर्ष अधिकच तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Advertisement

इराकमधील कुर्दांचे आक्रमक संघटन असलेल्या ‘पीकेके’ला तुर्कीने दहशतवादी घोषित केले होते. तसेच या संघटनेपासून आपल्या अखंडतेला धोका असल्याचे सांगून तुर्कीने इराकच्या सीमेत घुसून ‘पीकेके’वर कारवाई सुरू केली होती. गेल्या बुधवारी तुर्कीच्या लष्कराने ‘क्लॉ-इगल २’ नावाची लष्करी मोहिम राबवून ‘पीकेके’वर हल्ला चढविला होता. यावेळी झालेल्या संघर्षात ‘पीकेके’च्या ४८ जणांना ठार करण्यात आल्याची माहिती तुर्कीचे संरक्षणमंत्री हुलुसी अकार यांनी दिली. या संघर्षात तुर्कीचे तीन जवान ठार तर तीन जण जखमी झाल्याचे संरक्षणमंत्री अकार यांनी स्पष्ट केले.

‘पीकेके’मात्र ही मोहीम राबवित असताना एका गुहेत आपल्या जवानांना १३ तुर्की नागरिकांचे मृतदेह मिळाले. ‘पीकेकेच्या दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण करून हत्या घडवून आणली. जिवंत पकडण्यात आलेल्या पीकेकेच्या दहशतवाद्यांनी दिलेल्या माहितीमुळे हे उघड झाले’, असे तुर्कीच्या संरक्षणमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. तुर्कीच्या नागरिकांची पीकेकेच्या दहशतवाद्यांकडून हत्या होत असताना, सारे जग शांतपणे पाहत आहे, पण तुर्की शांत राहणार नाही, अशा शब्दात तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते एब्राहिम कालिन यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. पण ‘पीकेके’ने यासंदर्भात वेगळीच माहिती दिली.

‘तुर्कीबरोबरील संघर्षात हे १३ जण ठार झाले. ते सर्वसामान्य नागरिक नव्हते तर ते तुर्कीचे जवान, पोलीस व हेर होते. त्यांची हत्या घडविण्यात आलेली नाही. तर ते संघर्षात ठार झाले. पीकेके आपल्या ताब्यात असलेल्या कुणाचीही हत्या घडवित नाही’, असा खुलासा ‘पीकेके’ने केला आहे. तुर्कीने इराकच्या उत्तरेकडील भागात सुरू केलेली लष्करी कारवाई त्वरित थांबवावी, असा इशारा इराकी नेते हादी अल-अमिरी यांनी दिला आहे.

तुर्कीने इराक, सिरियाच्या भूभागातील कुर्द संघटनांकडून आपल्या अखंडतेला धोका असल्याचे सांगून त्यांच्या विरोधात लष्करी कारवाई सुरू ठेवली आहे. कुर्द संघटना याचा प्रतिकार करीत असल्याचे दिसू लागले आहे. आखातातील काही देशांचा पाठिंबा इराक व सिरियामधील कुर्दांना मिळत आहे. इराक, सिरिया, तुर्की इत्यादी देशांमध्ये कुर्दवंशिय विखुरले गेले असून त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी ‘ग्रेटर कुर्दिस्तान’ या स्वतंत्र देशाची निर्मिती करण्यासाठी कुर्द संघटना धडपडत आहे. यासाठी कुर्द संघटनांनी सशस्त्र लढा सुरू केला आहे.

कुर्दांचे हे गट इराक व सिरियामधील ‘आयएस’सारख्या दहशतवादी संघटनांबरोबर टक्कर घेत असल्याने आखातातील काही देशांची सहानुभूती कुर्दांना लाभत आहे. अमेरिकेनेही कुर्दांना पाठिंबा देण्याची भूमिका स्वीकारली होती. यावरून अमेरिका व तुर्कीमध्ये गंभीर मतभेद निर्माण झाले होते. अमेरिकेत बायडेन प्रशासन सत्तेवर आलेले असताना, अमेरिका व तुर्कीमधील संंबंध ताणले जाण्याची दाट शक्यता समोर येत आहे. त्याचा फायदा कुर्दांना होईल व अमेरिकेकडून कुर्द संघटनांना पाठबळ मिळेल, अशी शक्यता समोर येत आहे. यामुळे तुर्की अधिकच अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे.

leave a reply