इस्रायलचे पंतप्रधान भारताच्या भेटीवर येणार

नवी दिल्ली/जेरूसलेम – भारत आणि इस्रायलमधील राजनैतिक संबंधांना ३० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट भारताच्या भेटीवर येणार आहेत. इस्रायलचे भारतातील राजदूत नोर गिलॉन यांनी ही माहिती दिली. इस्रायली पंतप्रधानांच्या या भारत भेटीमुळे दोन्ही देशांच्या पुढच्या ३० वर्षातील सहकार्याला आकार देण्याची उत्तम संधी समोर आलेली आहे, असे राजदूत गिलॉन म्हणाले.

देशातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचे उत्पादन ३०० अब्ज डॉलर्सवर नेणार - केंद्रीय मंत्री अश्‍विनी वैष्णवभारत-इस्रायलच्या राजनैतिक संबंधांना तीन दशके पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यात दोन्ही देशांच्या सहकार्याचे बोधचिन्ह प्रदर्शित करण्यात आले. यावेळी बोलताना राजदूत गिलॉन यांनी पंतप्रधान नफ्ताली बेनेट भारतात येणार असल्याची माहिती दिली. भारत व इस्रायलचे संबंध इतर देशांप्रमाणे सर्वसामान्य पातळीवरचे नाहीत. तर हे दोन प्राचीन सभ्यतांमधील मैत्रीपूर्ण सहकार्य असल्याचा दावा यावेळी राजदूत गिलॉन यांनी केला.

ही वेळ दोन्ही देशांनी मिळविलेले यश साजरे करण्याची आहे. त्याचवेळी पुढच्या ३० वर्षांमधील दोन्ही देशांच्या संबंधांना आकार देण्यासाठी ही उत्तम संधी ठरू शकते, असे सांगून राजदूत गिलॉन यांनी पंतप्रधान बेनेट यांच्या या दौर्‍याचे महत्त्व अधोरेखित केले. येत्या काळात भारत व इस्रायलचे सर्वच क्षेत्रातील सहकार्य अधिकाधिक बहरत जाईल, असा विश्‍वास गिलॉन यांनी व्यक्त केला.

गेल्या वर्षी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी इस्रायलचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी इस्रायली पंतप्रधानांना भारताच्या भेटीचे आमंत्रण दिले होते.

इस्रायलचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बिन गुरियन यांनी भारत व इस्रायलची राष्ट्रीय चळवळ एकमेकांशी जोडलेली असल्याचे म्हटले होते. याची आठवण गिलॉन यांनी करून दिली. तसेच गुरियन यांना महात्मा गांधी यांच्याविषयी अतिशय आत्मियता होती. त्यांच्या घरात महात्मा गांधी यांचा फोटो होता, असे इस्रायली राजदूत म्हणाले. तर या वेबिनारमध्ये भारताचे इस्रायलमधील राजदूत संजीव सिंगला यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१७ सालच्या इस्रायल दौर्‍याची आठवण करून दिली.

भारतीय पंतप्रधानांच्या या इस्रायल भेटीला पाच वर्ष होत आहेत, असे सांगून या काळात दोन्ही देशांचे धोरणात्मक सहकार्य वेगळ्याच उंचीवर गेल्याचे सिंगला म्हणाले. मात्र भारत व इस्रायलचे सहकार्य केवळ व्यापार व आर्थिक सहकार्यापुरते मर्यादित नाही. प्राचीन वारसा लाभलेले दोन्ही देश संस्कृतिकदृष्ट्या परस्परांशी जोडलेले आहेत. भारतात ज्यूधर्मिय कित्येक शतकांपासून वास्तव्य करून आहेत. त्यांनी भारतीय संस्कृतीला अधिक समृद्ध करण्यासाठी योगदान दिलेले आहे, असे राजदूत सिंगला पुढ म्हणाले.

leave a reply