रशियापासून धोका असल्याचा दावा करून अमेरिकेची पूर्व युरोपातील तैनाती वाढविण्याची तयारी

- ५० हजार जवानांसह युद्धनौका व लढाऊ विमाने तैनात करण्याचे संकेत

युद्धनौका व लढाऊ विमानेवॉशिंग्टन/मॉस्को – युक्रेनवरील रशियन आक्रमणाचा धोका वाढत असतानाच अमेरिकेने पूर्व युरोपातील संरक्षणतैनाती अधिकच वाढविण्याचे संकेत दिले आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील ‘कॅम्प डेव्हिड’मध्ये राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी घेतलेल्या बैठकीत यासंदर्भातील पर्याय सादर करण्यात आले. आवश्यकता भासल्यास पूर्व युरोपिय देशांमध्ये ५० हजार जवानांसह युद्धनौका व लढाऊ विमाने तैनात करण्यात येतील, असे संकेत बायडेन प्रशासनातील सूत्रांनी दिले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन यांनी, युक्रेनमध्ये अमेरिकेची संरक्षणदले उतरु शकतात, अशीही शक्यता वर्तविली आहे. रशियाला पुरविण्यात येणार्‍या सेमीकंडक्टर्सच्या निर्यातीवर निर्बंध लादण्याचा इशाराही अमेरिकेकडून देण्यात आला.

रशिया व पाश्‍चात्य देशांमध्ये युक्रेन मुद्यावर झालेली चर्चा कोणत्याही तोडग्याविना निष्फळ ठरली आहे. या अपयशाच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही बाजूंकडून पुन्हा एकदा आक्रमक लष्करी हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. रशियाने युक्रेन सीमेवरील संरक्षणतैनाती वाढविली असून बेलारुसमध्येही अतिरिक्त लष्करी तुकड्या व संरक्षणयंत्रणा धाडल्या आहेत. रशियाकडून पूर्व युक्रेनमध्येही हालचाली सुरू असल्याचे दावे युक्रेन व पाश्‍चात्य देशांकडून करण्यात येत आहेत. दुसर्‍या बाजूला अमेरिकेसह इतर नाटो सदस्य देशांनी रशियाच्या संभाव्य आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

अमेरिका व ब्रिटनने युक्रेनमध्ये क्षेपणास्त्रांसह इतर शस्त्रे पाठविली आहेत. ब्रिटन तसेच कॅनडाने आपल्या स्पेशल फोर्सेसच्या तुकड्या युक्रेनमध्ये तैनात केल्या आहेत. रशियन सीमेनजिक असणार्‍या लाटव्हिया, लिथुआनिया व इस्टोनिया या देशांमधील संरक्षणतैनातीही वाढविण्यात येत आहे. सोमवारपासून भूमध्य सागरी क्षेत्रात नाटोचा व्यापक नौदल सरावही सुरू झाला असून त्यात अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका कॅरिअर स्ट्राईक ग्रुपसह सहभागी झाली आहे. मात्र त्यापलिकडे जात युरोपमधील संरक्षणतैनाती अधिक वाढविण्याचे संकेत अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने दिले आहेत.

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची संरक्षण विभागासह इतर वरिष्ठ अधिकार्‍यांसह बैठक झाली. या बैठकीत संरक्षण विभागाकडून काही प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातील एका प्रस्तावानुसार, गरज भासल्यास पूर्व युरोपमध्ये ५० हजार अमेरिकी जवान तैनात केले जाऊ शकतात. या जवानांसह अमेरिकी युद्धनौका तसेच लढाऊ विमानेही तैनात करण्यात येतील, असे बायडेन प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. सध्याच्या आकडेवारीनुसार, युरोपातील १५ देशांमध्ये अमेरिकेचे ६३ हजारांहून अधिक जवान तैनात आहेत. त्यापैकी पूर्व युरोपिय देशांमधील तैनाती हजाराहून कमी आहे. अशा पार्श्‍वभूमीवर, ५० हजार जवान तैनात करण्याचा प्रस्ताव लक्ष वेधून घेणारा ठरतो.

दरम्यान, रशियाला निर्यात करण्यात येणार्‍या सेमीकंडक्टर्सचा पुरवठा रोखण्याचे संकेत अमेरिकी सूत्रांनी दिले आहेत. रशियावर टाकण्यात येणार्‍या निर्बंधांमध्ये सेमीकंडक्टर्सवरील निर्बंधांबाबत गांभीर्याने विचार करण्यात येत असल्याचे अमेरिकी अधिकार्‍यांनी म्हटले आहे. रशिया बहुतांश सेमीकंडक्टर्स व चिप्स चीनमधून आयात करतो. मात्र प्रगत तंत्रज्ञान तसेच हवाई क्षेत्रासाठी लागणार्‍या चिप्स तैवानच्या ‘टीएसएमसी’कडून बनवून घेतल्या जातात. रशियावरील निर्बंधांसाठी अमेरिका या कंपनीला भाग पाडू शकतो, असे सांगण्यात येते.

leave a reply