इस्रायलने सौदीला हवाई सुरक्षा यंत्रणा पुरवावी

- अमेरिकी-इस्रायली अभ्यासकाचा दावा

हवाई सुरक्षाजेरूसलेम – संपूर्ण शांती आणि सहकार्य कराराच्या मोबदल्यात इस्रायलने सौदी अरेबियाला हवाई सुरक्षा यंत्रणा पुरवावी. इराण तसेच येमेनमधील हौथी बंडखोरांच्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी हवाई सुरक्षा यंत्रणेतील इस्रायलचे कौशल्य सौदीसाठी सहाय्यक ठरेल, असे प्रसिद्ध अमेरिकी-इस्रायली अभ्यासकांनी सुचविले आहे. इस्रायलचे तंत्रज्ञान आणि सौदीचा पैसा यामुळे सौदीच्या जनतेसाठी जागतिक दर्जाची हवाई सुरक्षा यंत्रणा उभी राहू शकते, असा दावा या अभ्यासकांनी केला.

जोएल रोझनबर्ग यांनी इस्रायली दैनिकासाठी लिहिलेल्या लेखात सौदी अरेबियावरील इराण तसेच हौथी बंडखोरांच्या हल्ल्याची माहिती दिली. गेल्या पाच वर्षांमध्ये येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियावर 4,100हून अधिक हल्ले चढविले आहेत. यामध्ये हजाराहून अधिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांचा समावेश होता. तर या हल्ल्यांमध्ये शंभराहून अधिक सौदींचा बळी गेला तर शेकडो जखमी झाले. त्याचबरोबर आत्मविश्‍वास वाढलेले हौथी बंडखोर उघडपणे सौदीवर हल्ले चढविण्याची धमकी देत आहेत, याकडे या अभ्यासकांनी लक्ष वेधले.

अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सौदी अरेबियाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रोझबनर्ग यांनी केला. बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेतल्यानंतर सौदीसाठीचे शस्त्रसहाय्य थांबविण्याचे आदेश दिले होते. तर काही महिन्यांपूर्वी अमेरिकेने सौदीतील तीन पॅट्रियॉट हवाई सुरक्षा यंत्रणा काढून घेतल्या होत्या. याचा फायदा घेऊन हौथी बंडखोरांनी रॉकेट, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांची तीव्रता वाढविली होती. याने सौदी अधिक असुरक्षित बनल्याचे दिसू लागले होते.

हवाई सुरक्षा यंत्रणेत अग्रेसर असलेल्या इस्रायलने आपल्या या कौशल्याचा लाभ सौदीला करून द्यावा, असे आवाहन या अभ्यासकांनी आपल्या लेखाद्वारे केले. यासाठी इस्रायलने युएई व बाहरिनप्रमाणे सौदीबरोबरही सहकार्य प्रस्थापित करायला हवे. अंतर्गत सुरक्षेच्या आघाडीवर इस्रायललाही याचे लाभ मिळतील, असा दावा रोझनबर्ग यांनी केला. म्हणूनच इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना या संबंधात प्रस्ताव द्यावा, असे रोझनबर्ग यांनी सुचविले आहे.

leave a reply