इस्रायल सौदीचा भविष्यातील सहयोगी ठरेल

- सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान

मोहम्मद बिन सलमानरियाध – ‘सौदी अरेबिया इस्रायलकडे शत्रू म्हणून पाहत नाही, तर संभाव्य सहयोगी म्हणून पाहते. सौदी आणि इस्रायल एकत्रितपणे अनेक समान हितसंबंधांवर काम करू शकतात’, अशी लक्षवेधी घोषणा सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी केली. ‘द अटलांटिक’ या अमेरिकन मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सौदीच्या क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी इस्रायलबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. याच मुलाखतीत क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी बायडेन आपल्याबाबत काय विचार करतात, याची पर्वा करीत नसल्याचे म्हटले होते.

इस्रायलची स्थापना झाल्यापासून सौदी अरेबियाने इस्रायलबरोबर कुठल्याही प्रकारे राजनैतिक सहकार्य प्रस्थापित केलेले नाहीत. याउलट १९६७ साली पॅलेस्टाईनच्या मुद्यावरुन अरब देशांनी इस्रायलविरोधात पुकारलेल्या युद्धामध्ये सौदीने सहभाग घेतला होता. त्याचबरोबर वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सौदीने पॅलेस्टाईनची बाजू उचलून धरली होती. अरब लीग तसेच गल्फ कोऑपरेशन काउन्सिलच्या बैठकीतही सौदीने अरब देशांचे नेतृत्व करून इस्रायलविरोधी भूमिका स्वीकारली होती.

पण राजे सलमान यांनी सौदीची सूत्रे हातात घेऊन क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना संरक्षणमंत्रीपदी निवड केल्यानंतर सौदीच्या धोरणांमध्ये मोठे बदल झाले आहेत. सौदीने इस्रायलविरोधातील आक्रमकता कमी केल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्षात आणून देत होते. अमेरिकन मासिकाशी बोलताना क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी तसे स्पष्ट केले.

‘इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष निकालात निघाला आहे, असे सौदीला वाटते’, असे सांगून इस्रायलविरोधातील कळीचा मुद्दा शिल्लक नसल्याचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद म्हणाले. त्याचबरोबर सौदी इस्रायलकडे शत्रू म्हणून नाही तर संभाव्य सहयोगी म्हणून पाहत असल्याचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी स्पष्ट केले. पण हे सहकार्य प्रस्थापित होण्याआधी सौदी व इस्रायलला काही मुद्दे सोडवावे लागतील, असे सूचक विधान क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी केले.

पॅलेस्टाईनचा मुद्दा सुटल्याशिवाय इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित होऊ शकत नसल्याचे संकेत क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी दिल्याचा दावा आखाती माध्यमे करीत आहेत. पण या विधानाच्या आधीच क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी इस्रायल व पॅलेस्टाईनमधील संघर्ष संपुष्टात आल्याचेही म्हटले आहे, याकडे इस्रायली विश्‍लेषक लक्ष वेधत आहेत. त्यामुळे सौदीचे राजपूत्र वेगळ्या मुद्याकडे लक्ष वेधत असल्याचे या इस्रायली विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply