रशिया-युक्रेनमधील युद्धाची किंमत जगाला चुकती करावी लागेल

- भारताच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

युद्धाची किंमतचंदोली – रशिया आणि युक्रेनचे युद्ध असेच सुरू राहिले, तर सार्‍या जगाला त्याची किंमत चुकती करावी लागेल, असा इशारा भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी दिला. युक्रेनवर रशियाने चढविलेल्या हल्ल्याला दहा दिवस पूर्ण होत असून या युद्धाची व्याप्ती वाढत चालली आहे. युक्रेन व रशियाच्या अर्थव्यवस्थेवर याचे परिणाम दिसू लागले आहेत. रशियाकडून इंधनाची आयात करणार्‍या देशांवर या युद्धाचा परिणाम होईल आणि अखेरीस त्याची किंमत सार्‍या जगाला चुकती करावी लागेल, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिला.

युक्रेनवर हल्ला चढविणार्‍या रशियाची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी करण्यासाठी अमेरिकेने राजनैतिक व आर्थिक आघाडीवर आक्रमक हालचाली सुरू केल्या आहेत. पण या प्रयत्नांना अद्याप अपेक्षित यश मिळालेले नाही. रशियाच्या विरोधात असलेल्या काही देशांनी अमेरिकेला जरूर साथ दिलेली आहे. पण फ्रान्स तसेच युरोपातील काही इतर देश रशियाच्या विरोधात अमेरिका-नाटोला अपेक्षित असलेली आक्रमक भूमिका घ्यायला तयार नाहीत. आखातातील देश देखील इंधनाचे उत्पादन वाढवून या युद्धात अमेरिकेच्या बाजूने उभे राहण्यास आपण तयार नसल्याचे दाखवून देत आहेत. इस्रायलने देखील रशियाच्या विरोधात जाण्याचे नाकारले आहे.

अशा परिस्थितीत रशियाचा पारंपरिक मित्रदेश असलेल्या भारताला आपल्या बाजूने वळवून रशियाच्या विरोधात जाण्यास भाग पाडण्यासाठ अमेरिका धडपडत आहे. शक्य त्या मार्गाने भारतावर दडपण टाकण्याचा प्रयत्न अमेरिका करीत असताना, भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी नेमक्या शब्दात अमेरिकेला युक्रेनमधील युद्धाच्या परिणामांची जाणीव करून दिली. हे युद्ध असेच सुरू राहिले, तर सार्‍या जगाला याची किंमत चुकती करावी लागेल, असे सांगून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी भारताची यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली.

युक्रेनची समस्या संघर्षाने सुटणार नाही, राजनैतिक स्तरावरील वाटाघाटी हा सदर समस्या सोडविण्याचा एकमेव मार्ग असल्याचे भारताचे म्हणणे आहे. तसेच या समस्येशी निगडीत असलेल्या सर्वच देशांना सुरक्षेची ग्वाही मिळायला हवी, असे भारताने स्पष्ट केले होते. युक्रेन नाटोत सहभागी होऊन रशियाची सुरक्षा धोक्यात आणणार नाही, याची हमी रशियाला हवी आहे. तर रशियापासून आपल्या सुरक्षेची ग्वाही युक्रेनला मिळाली, तर ही समस्या संपुष्टात येऊ शकते. ही बाब सामोपचाराने सोडविता येईल. पण इतर देशांचा हस्तक्षेप युक्रेनची समस्या चिघळवित आहे, असे भारत वेगळ्या मार्गाने सांगत आहे.

या प्रश्‍नावर उत्तर प्रदेशातील एका सभेत बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी युक्रेनमधील युद्धाच्या गंभीर परिणामांची जाणीव करून देत असताना, भारत व रशियाच्या संबंधांकडे युक्रेनमधील युद्धाच्या दृष्टीकोनातून पाहता येणार नाही, असे बजावले आहे. भारत आपल्या परराष्ट्र धोरणाचे स्वातंत्र्य गमावणार नाही आणि इतर देशांच्या सूचना ऐकून निर्णय घेणार नाही. भारत विधायक भूमिका स्वीकारून युद्ध टाळण्याला भारत सर्वाधिक प्राधान्य देईल, असा संदेश संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी दिल्याचे दिसत आहे.

leave a reply