इस्रायल आखाती देशांशी हवाई सुरक्षा करार करण्याची शक्यता

- इस्रायली दैनिकाचा दावा

हवाई सुरक्षा करार जेरूसलेम – इराण व इराणसंलग्न गटांचे ड्रोन्स आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांविरोधात इस्रायल व अरब देश आघाडी उभारीत आहेत. इराणच्या या हल्ल्यांपासून सुरक्षेसाठी इस्रायल व आखाती अरब देश लवकरच हवाई सुरक्षा करार करू शकतात. यामुळे इराणच्या हवाई हल्ल्यांना उत्तर देणे सोपे होईल, असा दावा इस्रायली दैनिकाने केला. चार दिवसांपूर्वी इस्रायलमध्ये पार पडलेल्या नेगेव्ह परिषदेत इस्रायल व अरब सहकारी देशांमध्ये यासंबंधी चर्चा पार पडली.

इस्रायली हवाईदलाच्या अधिकार्‍यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर स्थानिक दैनिकाशी बोलताना इस्रायल व अरब सहकारी देशांमधील या सहकार्याची माहिती दिली. आखातातील युएई, बाहरिन, इजिप्त या देशांबरोबर इस्रायल हवाई सुरक्षा यंत्रणेबाबत संभाव्य आघाडी उभारू शकतो, असे या अधिकार्‍यांनी सांगितले. नेगेव्ह परिषदेमध्ये सहभागी झालेल्या वरिल अरब देशांबरोबर इस्रायलने यासंदर्भात चर्चा केली आहे. त्याचबरोबर सिरियातून हवाई हल्ले रोखण्यात आपल्या देशाला मिळालेल्या यशाची उदाहरणे इस्रायलने यावेळी दिली.

इस्रायलचे हवाईदलप्रमुख एमिकाम नॉर्कीन यासाठी प्रयत्न करीत आहेत. इस्रायल व अरब सहकारी देशांमध्ये असे सहकार्य प्रस्थापित झाले तर संबंधित देशांची हवाई सुरक्षा याआधी कधीही नव्हती, अशी मजबूत होईल, असा दावा सदर अधिकार्‍यांनी केला. काही अरब देश इराण आणि इराकच्या सीमेपासून जवळ असल्यामुळे इराणच्या हल्ल्यांची पूर्वसुचना मिळणे शक्य होईल, असे इस्रायली अधिकार्‍यांनी म्हटले आहे.

इस्रायल किंवा नेगेव्ह परिषदेत सहभागी झालेल्या अरब देशांनी या बातमीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण याआधीही ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी इस्रायल व शेजारी देश ड्रोनविरोधी आघाडी उभारीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. युएई व बाहरिन हे देश इस्रायलकडून हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्याबाबत विचार करीत असल्याचे दावेही केले जात होते. इस्रायलच्या ताफ्यातील अतिप्रगत हवाई सुरक्षा यंत्रणांविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती.

leave a reply