रशियाबरोबरील सहकार्यावरून अमेरिकेचा भारताला ‘परिणामांचा’ इशारा

US warns India of 'consequences' for cooperation with Russia

‘परिणामांचा’ इशारानवी दिल्ली – रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह भारतात दाखल होण्याच्या आधीच अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलिप सिंग आणि ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रूस यांनी भारताला भेट दिली. भारत रशियाकडून इंधनाची खरेदी वाढविणार असून दोन्ही देश अमेरिकी निर्बंधांना बगल देण्यासाठी रूपया-रूबलमध्ये व्यवहार करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. यावर अमेरिकेने भारताला थेट शब्दात धमकी दिली आहे. भारताने रशियाबरोबर हा व्यवहार केलाच, तर त्याचे परिणाम संभवतात, असे दलिप सिंग यांनी यांनी बजावले आहे. ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इतकी आक्रमक विधाने केलेली नसली तरी रशियाबरोबरील भारताच्या सहकार्यावर आपला देश खूश नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

भारताने रशियाकडून इंधनाची खरेदी सुरू केली आहे. हा व्यवहार अमेरिकन निर्बंधांच्या कक्षेत येत नाही. मात्र त्याचवेळी आपल्या मित्र व सहकारी देशांनी रशियाबरोबरील आर्थिक सहकार्य वाढवू नये, अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. म्हणूनच भारताने रशियाकडून इंधनाची खरेदी करू नये व यासाठी रूपया-रूबलमध्ये व्यवहार करू नये. तसे झाले तर याचे गंभीर परिणाम संभवतात, अशा थेट शब्दात दलिप सिंग यांनी भारताला धमकावले आहे. इतकेच नाही, लडाखच्या एलएसीवरील तणावाची आठवण करून देऊन, चीनचा ज्युनिअर पार्टनर अर्थात कनिष्ठ सहकारी असलेल्या रशियाकडून भारताला चीनबरोबरील सीमावादात सहाय्य मिळण्याची शक्यता नाही, अशी सूचक विधाने दलिप सिंग यांनी केली आहेत.

रशियाबरोबरील सहकार्य वाढविलेच, तर चीनबरोबरील वादात अमेरिकेचे सहकार्य मिळण्याची अपेक्षा सोडून द्या, असा इशारा दलिप सिंग यांनी याद्वारे दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत रशियाकडून सवलतीच्या दरात इंधनाची खरेदी करीत असून हा व्यवहार अधिक वाढवित असल्याचे दिसू लागले आहे. अमेरिकेच्या निर्बंधांचा फटका बसू नये, यासाठी दोन्ही देश आपल्या रूपया-रूबल चलनात व्यवहार करण्यावर चर्चा करीत असल्याचे दावे केले जात होते. याची गंभीर दखल अमेरिकेने घेतली असून दलिप सिंग यांनी दिलेल्या धमक्या हेच दाखवून देत आहे.

ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्री लिझ ट्रूस देखील भारतात आल्या असून त्यांनीही थोड्याफार सौम्य शब्दात भारताला रशियाबरोबरील सहकार्याच्या परिणामांची जाणीव करून दिली. दलिप सिंग आणि लिझ ट्रूस यांच्या भारतभेटीचा हेतू एकसमान असल्याचे दावे काही वृत्तसंस्थांनी केले आहेत.

‘परिणामांचा’ इशाराअमेरिकेने रशियावर लादलेल्या कठोर निर्बंधांमुळे रशियाला डॉलरमध्ये व्यवहार करणे शक्य होणार नाही. मात्र याने रशियाची कोंडी होणार असली, तरी याचा फार मोठा फटका अमेरिकेलाच बसणार असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झालेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या गीता गोपीनाथ यांनी तर या निर्बंधांमुळे आंतरराष्ट्रीय चलन म्हणून अमेरिकेच्या डॉलरचे महत्त्व कमी होईल, असा इशारा दिला आहे. विख्यात अर्थतज्ज्ञ व गुंतवणूकदार देखील अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाला या धोक्याची जाणीव करून देत आहेत. तरीही बायडेन प्रशासनाने अमेरिकेसाठी घातक ठरणारी आर्थिक धोरणे स्वीकारली असून त्याचे पालन भारतासारख्या देशानेही करावे, अशी बायडेन प्रशासनाची अपेक्षा आहे.

भारताला परिणामांची धमकी देऊन बायडेन प्रशासनाने दबाव वाढविण्याची अधिक आक्रमक तयारी केली असून लवकरच यासंदर्भातील आपली भूमिका भारताला स्पष्ट करावी लागेल. आपल्या सहकारी देशांचा वापर करून देखील अमेरिका भारतावरील दडपण वाढविण्याचे प्रयत्न करीत आहे. युक्रेनचे युद्ध सुरू असताना, रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताला दिलेली भेट निराश करणारी असल्याचा दावा अमेरिकेसह ऑस्ट्रेलियाने देखील केला आहे. याद्वारे रशियाबरोबरील सहकार्यासाठी भारताला बरेच काही गमवावे लागेल, याची जाणीव बायडेन प्रशासन करून देत आहे.

leave a reply