इस्रायलचे परराष्ट्रमंत्री बाहरिनच्या ऐतिहासिक दौर्‍यावर

इस्रायलचे परराष्ट्रमंत्रीमनामा – अब्राहम करारानुसार उभय देशांमधील सहकार्य मजबूत करण्यासाठी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड गुरुवारी बाहरिनमध्ये दाखल झाले. इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बाहरिनचे राजे हमाद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांचा हा पहिला बाहरिन दौरा ठरतो. युएई, बाहरिन प्रमाणे इतर अरब देश देखील इस्रायलबरोबर अब्राहम करारात सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचा दावा इस्रायलने काही दिवसांपूर्वी केला होता.

वर्षभरापूर्वी अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल, युएई व बाहरिन यांच्यात ऐतिहासिक अब्राहम करार पार पडला. या करारानुसार, तीनही देशांचे परस्पर सहकार्य वाढविण्यावर एकमत झाले. यामुळे इस्रायल आणि अरब देशांमधील मतभेद कमी होण्यास मदत होईल, असा दावा अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यानंतर इस्रायलबरोबरच्या या करारात सुदान आणि मोरोक्को देखील सहभागी झाले. इस्रायल आणि अरब देशांमधील हे सहकार्य आखातातील तणाव कमी करण्यासाठी सहाय्यक ठरल्याचा दावा केला जातो.

इस्रायलचे परराष्ट्रमंत्रीगेल्या वर्षभरात युएई व बाहरिनने इस्रायलमध्ये आपले दूतावास सुरू केले. तर इस्रायलने देखील युएई व मोरोक्कोमध्ये आपले दूतावास कार्यान्वित केले आहेत. जून महिन्यात परराष्ट्रमंत्री लॅपिड यांच्या युएई व मोरोक्कोच्या दौर्‍यात ही कार्यवाही पार पडली. युएई व मोरोक्कोप्रमाणे बाहरिनमध्ये आपला दूतावास सुरू करण्यासाठी इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गुरुवारी मनामामध्ये दाखल झाले. परराष्ट्रमंत्री लॅपिड यांनी यावेळी बाहरिनचे राजे हमाद बिन इसा अल खलिफा आणि क्राऊन प्रिन्स सलमान बिन हमाद अल खलिफा यांची भेट घेतली. इस्रायल, युएई व बाहरिनमधील अब्राहम करार हा पूर्णपणे आर्थिक व व्यापारी सहकार्यावर आधारलेला असल्याचा दावा केला जातो. पण इराणपासून आखाती देशांच्या सुरक्षेला निर्माण झालेला धोका, इस्रायल व अरब देशांना या कराराच्या निमित्ताने जवळ आणत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे हा करार इराणसाठी आव्हान असल्याची टीका इराणमधील विश्‍लेषकांनी याआधी केली होती. इराणने देखील इस्रायलसह सहकार्य प्रस्थापित करणार्‍या अरब देशांवर ताशेरे ओढले होते.

दरम्यान, लवकरच सौदी अरेबिया व इतर अरब देश अब्राहम करारात सहभागी होऊ शकतो, असा दावा इस्रायलने याआधी केला होता. तर काही दिवसांपूर्वी इराकमधील ३००हून अधिक नेत्यांनी देखील आपल्या देशाने अब्राहम करारात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

leave a reply