इस्रायलची विमाने इराणपर्यंत धडकू शकतात

- इस्रायलच्या गुप्तचर मंत्रालयाचे प्रमुख

जेरूसलेम/वॉशिंग्टन – ‘इराणबरोबरच्या अणुकराराबाबत व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या राजनैतिक वाटाघाटींशी इस्रायलचा संबंध नाही. काहीही झाले तरी इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही. इस्रायलची विमाने थेट इराणपर्यंत पोहोचू शकतात’, असा सज्जड इशारा इस्रायलच्या गुप्तचर मंत्रालयाचे प्रमुख एली कोहेन यांनी दिला. तर, ‘इस्रायलला ज्या अणुकरारात सहभागी केलेले नाही, त्यावर इस्रायलची सुरक्षा अवलंबून राहू शकत नाही’, असे अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत गिलाड एर्डन यांनी बजावले. इस्रायलचे हे दोन्ही इशारे इराणबरोबरच अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाला उद्देशून असल्याचे दिसत आहे.

Advertisement

२०१५ साली इराणबरोबर केलेल्या अणुकराराचे पुनरूज्जीवन करण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केली आहे. इराणबरोबरच्या अणुकरारासाठी बायडेन प्रशासनाकडून सुरू असलेल्या या हालचालींवर इस्रायलमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अमेरिका व इराणमध्ये झालेल्या कुठल्याही कराराशी इस्रायल बंधनकारक नसल्याचे, इस्रायलच्या गुप्तचर मंत्रालयाचे प्रमुख एली कोहेन यांनी ठणकावले.

‘अल्पकालिन फायदे मिळविण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी दिर्घकालिन परिणामांचा विचार करावा. कारण चुकीचा करार या क्षेत्राला युद्धाच्या खाईत ढकलू शकतो. म्हणूनच काहीही झाले तरी इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही. इस्रायलच्या हल्ल्यांपासून इराण सुरक्षित राहू शकत नाही. इस्रायलची विमाने आखातात कुठेही पोहोचू शकतात. अगदी इराणपर्यंतही धडक मारू शकतात’, असा इशारा कोहेन यांनी दिला.

‘इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ द्यायचे नसेल तर आंतरराष्ट्रीय समुदायाने युरेनियमचे संवर्धन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मितीपासून रोखावे. त्याचबरोबर या क्षेत्रातील देशांमध्ये अस्थैर्य निर्माण करणार्‍या दहशतवादी संघटनांना इराणकडून मिळणारे अर्थसहाय्य रोखावे’, असे आवाहन कोहेन यांनी केले.

इस्रायली गुप्तचर मंत्रालयाच्या प्रमुखांप्रमाणे इस्रायलचे अमेरिकेेतील राजदूत गिलाड एर्डन यांनी देखील व्हिएन्ना येथील बैठकीत होणार्‍या कराराशी इस्रायल बांधलेला नसेल, असे स्पष्ट केले. तसेच आखातातील धोक्यांचा सामना करण्यासाठी इस्रायलला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे व तो बायडेन प्रशासनानेही मान्य केला आहे, असे सूचक विधान एर्डन यांनी केले.

दरम्यान, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटी चौथ्या आठवड्यात पोहोचल्या आहेत. सोमवारपासून या वाटाघाटी सुरू होणार आहेत. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात इराणवर लादलेले सर्व निर्बंध मागे घेण्याची तयारी केल्याचा दावा केला जातो. इराणला देखील हेच अपेक्षित असल्याचे दावे माध्यमे करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, इस्रायलकडून हे इशारे दिले जात आहेत.

leave a reply