इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांची युएईला अघोषित भेट

तेल अविव – इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी गुरुवारी युएईचा अघोषित दौरा केला. पंतप्रधान बेनेट युएईचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झाएद यांची भेट घेणार असल्याची माहिती इस्रायली माध्यमांनी दिली आहे. तर पंतप्रधान बेनेट यांनी आपल्या दौऱ्याच्या काही काळ आधी, आपण युएईच्या नेतृत्त्वाशी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती दिली.

Naftali-Bennettगेल्याच आठवड्यात इस्रायल आणि युएईमध्ये मुक्त व्यापारी करार पार पडला. 2020 साली झालेल्या अब्राहम करारानंतर इस्रायल आणि युएईमध्ये अतिशय वेगाने मुक्त व्यापारी करारासंबंधी घडामोडी सुरू होत्या. मात्र दोन्ही देशांमधले हे सहकार्य केवळ व्यापारापुरते मर्यादित नसून पुढच्या काळात उभय देश भक्कम लष्करी सहकार्य प्रस्थापित करणार असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

युएईमध्ये दाखल होण्याआधी पंतप्रधान बेनेट यांनी दिलेल्या माहितीत, युएईच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत चर्चा करणार असल्याचे जाहीर केले. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुकार्यक्रमावर चिंता व्यक्त केली आहे. इराणने आपल्या महत्वाच्या अणुप्रकल्पातील दोन सीसीटीव्ही कॅमेरा बंद केल्याचा दावा अणुऊर्जा आयोग करीत आहे. त्यानंतरच इस्रायलचे पंतप्रधान युएईला रवाना झाल्याचे इस्रायली माध्यमे लक्षात आणून देत आहेत.

गुरुवारी दुबईमध्ये दाखल झालेल्या इस्रायलच्या पंतप्रधानांनी युएईचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाह बिन झाएद यांची भेट घेतली. यानंतर ते राष्ट्राध्यक्ष मोहम्मद बिन झाएद अल नह्यान यांच्याशी चर्चा करणार आहेत.

इराणच्या अणुकार्यक्रमाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढला असून हा देश पूर्वी कधीही नव्हता इतक्या प्रमाणात अणुशक्त बनण्याच्या मार्गावर असल्याची कबुली आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने दिली आहे. तर कुठल्याही परिस्थितीत इराणला अणुबॉम्बने सज्ज होऊ देणार नाही, असे इस्रायलने याआधीच घोषित केले होते. तसेच इराणच्या अणुकार्यक्रमाविरोधात आपण अरब-आखाती देशांचे सहकार्य मिळविणार असल्याचेही इस्रायल जाहीरपणे सांगत आहे. सौदी अरेबिया व युएई या देशांचा इराणच्या अणुकार्यक्रमाला असलेला विरोध इस्रायलइतकाच तीव्र आहे. त्यामुळे इस्रायलच्या पंतप्रधानांची ही अघोषित युएई भेट धोरणात्मकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची ठरते. याकडे केवळ आखातीच नाही, तर जगभरातील माध्यमांचे लक्ष लागले आहे.

leave a reply