ग्रीससह अमेरिकेलाही तुर्कीकडून धमक्या

तुर्कीकडून धमक्याअंकारा – ‘ग्रीसने दिवास्वप्न पाहण्याचे सोडून द्यावे. तुर्कीच्या विरोधात प्रतिक्रिया देणे आणि कारवाई करण्याचा विचारही ग्रीसने करू नये. अन्यथा ग्रीस ताळ्यावर येईल, असे जबरदस्त प्रत्युत्तर तुर्कीकडून मिळेल’, असा गंभीर इशारा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी दिला. काही तासांपूर्वी ग्रीसमधील लष्करी तळाचा विस्तार करणाऱ्या अमेरिकेलाही तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी बजावले होते. ग्रीसमधील अमेरिकेच्या लष्करी उपस्थितीवर एर्दोगन यांनी प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, नाटोचा सदस्य देश असलेला तुर्की नाटोच्या इतर सदस्य देशांविरोधात भूमिका स्वीकारत असल्याचे गेल्या पंधरा दिवसांमध्ये सातत्याने पहायला मिळत आहे.

साऱ्या जगाचे लक्ष रशिया-युक्रेन युद्धाकडे लागलेले आहे. याचा फायदा घेऊन तुर्की आपले हेतू साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रीसच्या पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी केला होता. ग्रीसच्या ताब्यातील बेटांवरील सैन्य मागे घेण्याची मागणी करणारा तुर्की येत्या काळात या बेटांचा ताबा घेऊ शकतो, अशी भीती ग्रीसला सतावित आहे. लष्कराच्या जोरावर या बेटांचा ताबा घेता आला नाही, तर निर्वासितांचे लोंढे ग्रीसच्या बेटांवर सोडण्याची तयारी तुर्कीने केली आहे. ग्रीसने उघडपणे हा आरोप केला होता.

पण तुर्कीच्या चिथावणीखोर कारवायांना आपण भीत नसल्याचे सांगून ग्रीसने आपल्या लष्कराला अलर्ट राहण्याचे आदेश दिले होते. त्यातच अमेरिकेने ग्रीसबरोबर लष्करी सराव आणि लष्करी तळाचा विस्तार करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. यामुळे अस्वस्थ झालेल्या तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिका आणि ग्रीसला धमकावले. ‘सध्या ग्रीसमध्ये अमेरिकेचे नऊ लष्करी तळ आहे. ही तैनाती रशियाविरोधात असल्याचा दावा अमेरिका करीत आहे. पण तुर्कीचा यावर अजिबात विश्वास नाही’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी ग्रीसमधील अमेरिकेच्या तैनातीवर शंका उपस्थित केली.

तुर्कीकडून धमक्यातुर्की ‘एजियन समुद्रा’वरील आपला दावा कधीही सोडून देणार नसल्याचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी ठणकावले. ‘या सागरी क्षेत्रावर तुर्कीचा अधिकार आहे. त्याच्या सुरक्षेसाठी तुर्की आपल्या अधिकारांचा नक्की वापर करील’, अशा शब्दात तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी ग्रीसला धमकावले. त्याचबरोबर ग्रीसने तुर्कीविरोधात कारवाईचा विचार केलाच तर त्याला जबरदस्त प्रत्युत्तर मिळेल, असेही राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी बजावले.

ग्रीस आणि तुर्की, दोघेही नाटोचे सदस्य देश आहेत. असे असले तरी या दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण संबंध राहिले आहेत. गेल्या पाच दशकांमध्ये सीमावादावरुन ग्रीस व तुर्कीमध्ये तीनवेळा युद्ध पेटण्याची परिस्थिती उद्भवली होती. 1996 साली एजिअन समुद्रातील बेटांच्या अधिकारावरुन दोन्ही देशांचे लष्कर आमनेसामने आले होते. भूमध्य समुद्र आणि एजिअन समुद्राच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खनिजांचा साठा आहे. या सागरी संपत्तीवर ताबा मिळविण्यासाठी ग्रीस व तुर्कीमध्ये तणाव निर्माण झाल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, तुर्की आणि ग्रीसचा वाद जुना आहे. पण गेल्या काही आठवड्यांमध्ये तुर्कीने ग्रीससह नाटोच्या इतर सदस्य देशांवर टीकेची झोड उठविली होती. फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड् हे नाटोचे सदस्यदेश दहशतवादाचे समर्थक असल्याचा आरोप तुर्कीने केला होता. तर युक्रेन युद्धातील अमेरिकेच्या भूमिकेवरही तुर्कीने प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर नाटोमध्ये स्वीडन व फिनलँडच्या समावेशावर आक्षेप घेऊन तुर्कीने अमेरिका व युरोपिय महासंघाच्या निर्णयाला विरोध केला होता. यामुळे ग्रीससोबत नाटोचे इतर सदस्य देश देखील तुर्कीवर नाराज आहेत.

leave a reply