इस्रायलला इराणच्या विरोधातील आगळिकीचे प्रत्युत्तर दिले जाईल

- इराणच्या राजदूतांचा इशारा

तेहरान – इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चे माजी प्रमुख योसी कोहेन यांच्या गौप्यस्फोटानंतर इराणमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ‘इस्रायलनेच इराणच्या अणुप्रकल्पांमध्ये घातपात घडविल्याचे कोहेन यांच्या मुलाखतीतून स्पष्ट होते. तसेच या मुलाखतीतून मोसादचे माजी प्रमुख इराणच्या अणुशास्त्रज्ञांना धमकावित असल्याचे दिसत आहे’, असा ठपका संयुक्त राष्ट्रसंघातील इराणच्या प्रवक्त्यांनी ठेवला. या आगळिकीचे इस्रायलला नक्कीच प्रत्युत्तर मिळेल, अशी धमकी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगातील इराणच्या राजदूतांनी दिली.

इस्रायलला इराणच्या विरोधातील आगळिकीचे प्रत्युत्तर दिले जाईल - इराणच्या राजदूतांचा इशारामोसादचे माजी प्रमुख योसी कोहेन यांनी गेल्या आठवड्यात इस्रायली वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. इराणच्या अणुप्रकल्पांतील निकामी झालेले सेंट्रिफ्यूजेस, अणुशास्त्रज्ञ फखरीझादेह यांच्यापर्यंत पोहोचलेले इस्रायलचे एजंट्स तसेच इराणच्या अणुकार्यक्रमाचे गोपनीय दस्तावेज मिळविण्यासाठी आखलेली मोहीम, यांचा सूचक शब्दातील उल्लेख कोहेन यांनी केला होता. मात्र मोसादच्या माजी प्रमुखांनी स्पष्टपणे इराणच्या अणुप्रकल्पात स्फोट घडविल्याची कबुली दिली नाही. पण ‘इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही, हा इस्रायलचा इशारा इराणने अधिक गांभीर्याने घ्यायला हवा होता’, हा इशारा देऊन कोहेन यांनी अप्रत्यक्षपणे नातांझमधील स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती.

इस्रायलला इराणच्या विरोधातील आगळिकीचे प्रत्युत्तर दिले जाईल - इराणच्या राजदूतांचा इशाराकोहेन यांच्या या मुलाखतीनंतर इराणने आपल्या अणुप्रकल्पातील स्फोटांसाठी इस्रायलला जबाबदार ठरविले आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील इराणचे प्रवक्ते शाहरोख नझेमी यांनी इस्रायल अराजक माजविणारा देश असल्याचा आरोप केला. ‘इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या माजी प्रमुख निर्लज्जपणे जगासमोर येऊन इराणच्या अणुशास्त्रज्ञांना धमकी देत आहे, हे पाहता इस्रायल बेबंदशाहीच्या शिखरावर पोहोचल्याचे स्पष्ट होते. आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलचा हा उन्माद अजिबात सहन करता कामा नये’, अशी टीका नझेमी यांनी केली.

इस्रायलला इराणच्या विरोधातील आगळिकीचे प्रत्युत्तर दिले जाईल - इराणच्या राजदूतांचा इशारा‘अणुप्रकल्पांवर हल्ले चढविणार्‍या इस्रायलला इराणकडून निर्णायक प्रत्युत्तर मिळेल. पण त्याचबरोबर आपल्या अणुकार्यक्रमासंबंधी पारदर्शी राहून सहकार्य करणार्‍या इराणला यापुढे आपल्या भूमिकेवर फेरविचार करावा लागेल’, अशी धमकी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगातील इराणचे राजदूत काझेम घरीबाबादी यांनी दिली. अणुप्रकल्पांचे पारदर्शी निरिक्षण करण्यासाठी इराण सहाय्य करीत नसल्याचा आरोप आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाच्या प्रमुखांनी नुकताच केला होता. पण घरीबाबादी यांनी इस्रायलवरील टीकेच्या निमित्ताने अणुऊर्जा आयोगालाही इशारा दिल्याचे दिसत आहे.

दरम्यान, इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांनी कोहेन यांच्या या मुलाखतीनंतर मोठा दावा केला आहे. काही वर्षांपूर्वी इराणच्या गुप्तचर यंत्रणेने इस्रायलविरोधी कारवाईसाठी नेमलेले मोठे अधिकारीच इस्रायलचे एजंट होते, असे जाहीर करून अहमदीनेजाद यांनी खळबळ माजविली आहे.

leave a reply