इस्रोकडून ‘इओएस-06’सह नऊ उपग्रहांचे प्रक्षेपण

एकाच मोहिमेत वेगवेगळ्या कक्षेत उपग्रह सोडण्यात यश

श्रीहरिकोटा – ‘पीएसएलव्ही-सी54’द्वारे इस्त्रोने ‘इओएस’ उपग्रहासह आणखी आठ उपग्रह अवकाशात सोडले. हे उपग्रह वेगवेगळ्या कक्षेत सोडण्याची कामगिरी ‘पीएसएलव्ही-सी54’ने यशस्वीरित्या पार पाडली असून यासाठी इस्रोची प्रशंसा केली जात आहे. राष्ट्रपती व पंतप्रधानांनी यासाठी इस्रोचे अभिनंदन केले आहे. इस्रोने प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांमध्ये भारत व भूतानचा संयुक्त प्रकल्प असलेला उपग्रह देखील आहे. दोन्ही देशांच्या या सहकार्याचीही विशेष दखल घेतली जात आहे.

EOS-06‘पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल’ अर्थात ‘पीएसएलव्ही-सी54’द्वारे शनिवारी इस्रोने एकूण नऊ उपग्रह प्रक्षेपित केले. यामध्ये ‘अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट’ (इओएस-06) या 1,117 किलो वजनाच्या उपग्रहाचा समावेश आहे. हा थर्ड जनरेशन अर्थात तिसऱ्या पिढीतील प्रगत उपग्रह असून यामुळे सागरी क्षेत्रातील जैविक स्थितीचे निरिक्षण करणे या उपग्रहामुळे शक्य होईल. या उपग्रहामुळे चक्रीवादळांचा वेध घेण्यापासून हवामानातील बदल आणि मासेमारीची क्षेत्र निवडण्यापर्यंतची कामे अधिक सोपी होतील. तसेच सागरी सुरक्षेसाठीही या उपग्रहाचा अत्यंत प्रभावीरित्या वापर होऊ शकेल. हा उपग्रह देशासाठी महत्त्वाचा ठरेल, असा विश्वास ‘स्पेसक्राफ्ट’च्या संचालिका थेन्मोझी सेल्वी यांनी व्यक्त केला आहे.

या ‘इओएस-06’ उपग्रहाबरोबर आणखी आठ उपग्रह ‘पीएसएलव्ही-सी54’द्वारे प्रक्षेपित करण्यात आले होते. महत्त्वाची बाब म्हणजे हे उपग्रह वेगवेगळ्या कक्षेत सोडले जाणार होते. त्यामुळे याच्या यशापयशावर संशोधकांची नजर खिळलेली होती. पण ‘पीएसएलव्ही-सी54’ने ही कामगिरी फत्ते करून दाखविली व हे उपग्रह वेगवेगळ्या कक्षेत यशस्वीरित्या सोडले. हे इस्रोला मिळालेले फार मोठे यश ठरते. यासाठी देशभरातून इस्रोची प्रशंसा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या यशासाठी इस्रोचे अभिनंदन केले. तसेच भारत व भूतानच्या उपग्रहाच्या प्रक्षेपणावरही राष्ट्रपती मुर्मू यांनी समाधान व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इओएस-06’ उपग्रहामुळे देशाच्या सागरी क्षेत्रातील सर्वच स्त्रोतांचा योग्य वापर करणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त केला. या उपग्रहाच्या प्रक्षेपणाबरोबरच इस्रोने प्रक्षेपित केलेल्या आठ इतर उपग्रहांचीही दखल घेऊन पंतप्रधान मोदी यांनी यासाठी इस्रो व सदर प्रकल्पाशी निगडीत असलेल्या भारतीय कंपन्यांचेही कौतूक केले. तर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी देखील इस्रोचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर भारत व भूतानच्या उपग्रह प्रक्षेपणावर समाधान व्यक्त करून जयशंकर यांनी भारत व भूतानने पुढच्या काळातही अंतराळ संशोधन क्षेत्रातील सहकार्य वाढवावे, असे आवाहन केले आहे.

भारताने याआधी 2017 साली दक्षिण आशियाई क्षेत्रातील देशांचा संयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला होता. भारताने दक्षिण आशियाई देशांना दिलेली ही फार मोठी भेट होती, याची आठवण परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी या निमित्ताने करून दिली.

leave a reply