26/11च्या हल्ल्यातील बळींना देशभरातून श्रद्धांजली

26/11 terror attack anniverasryनवी दिल्ली/जेरूसलेम – 26/11च्या हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने या हल्ल्यात बळी पडलेल्या व दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्यांना देशभरात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यासाठी देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. इस्रायलच्या भारतातील राजदूतांनी भारतासह आपला देशही 26/11चा हल्ला कधीही विसरणार नाही, असा इशारा दिला. हा हल्ला विसरता येणार नाही आणि त्याच्या सूत्रधारांना कधीही माफ करता येणार नाही, असा संदेशही इस्रायलच्या राजदूतांनी दिला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. तर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी हा दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्यांना व त्यासाठी सहाय्य करणाऱ्यांना शासन झालेच पाहिजे, अशी मागणी केली. दहशतवाद हा मानवतेच्या विरोधातला गंभीर अपराध ठरतो, याची जाणीव करून देऊन परराष्ट्रमंत्र्यांनी 26/11च्या हल्ल्याचे गांभीर्य जगाच्या लक्षात आणून दिले आहे. एकाच दिवसापूवी सुरक्षा परिषदेच्या ‘काऊंटर टेररिझम कमिटी-सीटीसी’मध्ये बोलताना भारताच्या राजदूत रूचिरा कंबोज यांनी 26/11च्या सूत्रधारांवर कारवाईचे प्रयत्न राजकीय हेतूने रोखण्यात आल्याची टीका केली होती.

दहशतवाद्यांना सर्वतोपरी सहाय्य करून भारतात घातपात घडवून आणणारा पाकिस्तान व या दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांवरील सुरक्षा परिषदेची कारवाई रोखणारा चीन, यांना भारताच्या राजदूतांनी आपल्या भाषणात लक्ष केले होते. 26/11च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी ज्यूधर्मियांच्या छाबड हाऊसला देखील लक्ष्य केले होते. त्याची आठवण करून देऊन भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलॉन यांनी, आपला देश हा दहशतवादी हल्ला कधीही विसरणार नाही आणि त्यामागे असलेल्यांना कधीही माफ केले जाणार नाही, असा कडक संदेश दिला.

26/11च्या हल्ल्याला 14 वर्ष पूर्ण होत असताना, दहशतवादाविरोधातील लढ्यात इस्रायल पूर्णपणे भारताच्या बाजूने उभा आहे, असे राजदूत गिलॉन यांनी ठासून सांगितले. तसेच भारताने दहशतवादाच्या विरोधात सुरू केलेल्या प्रयत्नांना इस्रायलचा पाठिंबा असल्याचेही राजदूत गिलॉन पुढे म्हणाले. इस्रायली राजदूतांनी भारतासह इस्रायल देखील दहशतवादाचा बळी ठरलेला देश असल्याचे म्हटले आहे. दहशतवादाला पराभूत करायचे असेल, तर सर्वांचे एकजूट अत्यावश्यक आहे, असा दावा राजदूत गिलॉन यांनी केला.

leave a reply