अमेरिकेने युक्रेनला दिलेली शस्त्रास्त्रे ‘ट्रॅक’ करणे अवघड

संरक्षण विभागाच्या इन्स्पेक्टर जनरलचा दावा

tanks-being-sent-ukraineवॉशिंग्टन/किव्ह – अमेरिकेने युक्रेनला केलेल्या शस्त्रपुरवठ्याच्या ‘ट्रॅक’ ठेवणे अवघड असल्याचा दावा संरक्षण विभागाचे इन्स्पेक्टर जनरल रॉबर्ट स्टॉर्क यांनी केला आहे. मंगळवारी अमेरिकेच्या संसदीय समितीसमोर झालेल्या सुनावणीत स्टॉर्क यांनी, युक्रेनला दिलेली शस्त्रे नक्की कोणाच्या हातात पडतात, याची माहिती ठेवणे शक्य नसल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली. अमेरिकेने गेल्या वर्षभरात युक्रेनला ३१ अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्याची शस्त्रे पुरविल्याचे सांगण्यात येते. यात रॉकेटस्‌‍, तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्रे, ड्रोन्स, हेलिकॉप्टर्स, रडार व इतर प्रगत यंत्रणांचा समावेश आहे.

अमेरिकेकडून २०१४ सालापासून युक्रेनला मोठ्या प्रमाणात संरक्षण सहाय्य पुरविण्यात येते. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रशियाने हल्ला चढविल्यानंतर अमेरिकेने युक्रेनला करण्यात येणाऱ्या शस्त्रसहाय्यात प्रचंड प्रमाणात वाढ केली. अवघ्या वर्षभरात अमेरिकेने युक्रेनला ३१ अब्ज डॉलर्सहून अधिक मूल्याची शस्त्रास्त्रे पुरविली आहेत. अमेरिकेच्या संसदेत युक्रेनला ५० ते ६० अब्ज डॉलर्सपर्यंत शस्त्रास्त्रे पुरविण्यात यावीत, असे विधेयकही संमत करण्यात आले आहे.

Mr-Storch-UAPराष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी रशिया पराभूत होईपर्यंत अमेरिका युक्रेनला शस्त्रपुरवठा करील, असे आश्वासनही दिले आहे. मात्र युक्रेनला मिळणाऱ्या या शस्त्रास्त्रांचा नीट हिशोब ठेवला जात नसल्याची तक्रार अमेरिकी अधिकारी, विश्लेषक तसेच संसद सदस्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. अमेरिकेने शस्त्रपुरवठा नीट व्हावा म्हणून युक्रेनमध्ये अमेरिकी लष्कराची तुकडीही तैनात केल्याचे सांगण्यात येते. मात्र तरीही युक्रेनमधील शस्त्रांचा ट्रॅक ठेवण्यात अमेरिकी लष्कराला अपयश आल्याचे इन्स्पेक्टर जनरल रॉबर्ट स्टॉर्क यांच्या वक्तव्यातून समोर येत आहे.

रशियाने केलेल्या दाव्यांनुसार, अमेरिकेतून येणारी शस्त्रे मोठ्या प्रमाणात आखाती देश, आफ्रिका व आग्नेय आशियाई देशांमध्ये पाठविण्यात येत आहेत. गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात अमेरिकेच्या शस्त्रपुरवठ्यापैकी ३० टक्के शस्त्रेच युक्रेनी लष्करापर्यंत पोहोचत असल्याचे उघड झाले होते.

leave a reply