चीनपासून अमेरिकेच्या अस्तित्वाला धोका आहे

अमेरिकन लोकप्रतिनिधीगृहाचा इशारा

वॉशिंग्टन – ‘अमेरिकेच्या अस्तित्वाला चीनपासून धोका आहे व तो वाढत चालला आहे. चीनचा हा धोका यशस्वीपणे मोडून काढायचा असेल तर अमेरिकेला सहकारी देशांचे सहाय्य घ्यावे लागेल’, असा इशारा अमेरिकन लोकप्रतिनिधीगृहाने दिला. त्याचबरोबर गेल्या तीन दशकांमध्ये अमेरिकेतील डेमोक्रॅट्स तसेच रिपब्लिकन या दोन्ही पक्षांनी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीच्या धोक्याकडे दुर्लक्ष केल्याची टीका प्रतिनिधीगृहाने केली आहे.

gallagher krishnamoorthi_Pratyakshaगेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या भरघोस प्रतिसाद मिळाला. याचा परिणाम म्हणून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहावर रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. प्रतिनिधीगृहाचा ताबा घेताच रिपब्लिकन पक्षाने चीनविरोधात विशेष समिती स्थापन केली. मंगळवारी ‘हाऊस सिलेक्ट कमिटी ऑन द चायनिज्‌‍ कम्युनिस्ट पार्टी’ या समितीचे अध्यक्ष माईक गॅलाघर यांनी चीनपासून अमेरिकेच्या अस्तित्वाला असलेला धोका अधोरेखित केला.

‘हा काही टेनिसचा सामना नाही. तर अमेरिकेच्या अस्तित्वाचा प्रश्न असून २१व्या शतकात आपले आयुष्य कसे असेल यासाठीचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षात आपले स्वातंत्र्य पणाला लागले आहे’, असे गॅलाघर म्हणाले. आपल्या येत्या दहा वर्षातील धोरणे पुढच्या शंभर वर्षासाठी महत्त्वाची ठरतील, असेही गॅलाघर यांनी सांगितले. तर गेल्या तीन दशकात डेमोक्रॅट्स किंवा रिपब्लिकन पक्षाने चीनच्या कम्युनिस्ट राजवटीपासून निर्माण झालेल्या या धोक्याकडे दुर्लक्ष केल्याची टीका गॅलाघर यांचे सहकारी राजा कृष्णमुर्ती यांनी केली. ‘अमेरिका आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळाल्यापासून चीनची अर्थव्यवस्था दहापटीने वाढली आहे. याचा फायदा घेऊन कम्युनिस्ट पार्टीने देशांतर्गत एकाधिकारशाही लागू केली, उघूरवंशियांचे हत्याकांड घडविले आणि आज हीच कम्युनिस्ट राजवट तैवानसह आपल्या शेजारी देशांच्या सुरक्षेसाठी धोका ठरत आहे’, याकडे राजा कृष्णमूर्ती यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर चीनने अमेरिकेच्या बुद्धिसंपदेची चोरी केल्याचा आरोपही कृष्णमूर्ती यांनी केला.

दरम्यान, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात चीनविषयक समितीची झालेली स्थापना बायडेन प्रशासनाच्या चीनधार्जिण्या धोरणांना आव्हान देणारी ठरेल, असा दावा अमेरिकेतील विश्लेषक करीत आहेत. याच समितीने वुहान लॅब लिक तसेच अमेरिकेतील सिक्रेट चायनिज्‌‍ पोलीस स्टेशन्सचा मुद्दा नव्याने उपस्थित केला आहे.

leave a reply