इटलीच्या पंतप्रधान मेलोनी भारतभेटीवर

मेलोनीनवी दिल्ली – इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिआ मेलोनी भारताच्या भेटीवर आल्या असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा पार पडली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उभय नेत्यांनी भारत व इटलीचे सहकार्य व्यापक करण्याची घोषणा केली. भारत व इटलीमधील धोरणात्मक तसेच संरक्षणविषयक भागीदारीचे नवे पर्व सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी व पंतप्रधान जॉर्जिआ मेलोनी यांनी जाहीर केले.

जी२० परिषद व मंगळवारपासून आरंभ झालेल्या ‘रायसेना डायलॉग’च्या पार्श्वभूमीवर, इटलीच्या पंतप्रधान भारतभेटीवर आल्या आहेत. भारत व इटलीच्या द्विपक्षीय संबंधांना ७५ वर्ष पूर्ण होत असून याचे औचित्य साधून दोन्ही देशांनी आपले सहकार्य धोरणात्मक भागीदारीमध्ये विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन्ही देशांनी दहशतवाद व विघटनवादाच्या विरोधात एकजूट करण्याचा निर्धार केला आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. याबरोबरच इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी इटलीने सक्रीय सहभाग घेतल्याचे सांगून यासाठी भारताच्या पंतप्रधानांनी इटलीची प्रशंसा केली.

भारत व इटली एकत्र येऊन बरेच काही घडवू शकतात. अक्षय ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, आयटी, सेमीकंडक्टर, टेलिकॉम आणि अंतराळ क्षेत्रात भारत व इटलीचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास इटलीच्या पंतप्रधानांनी व्यक्त केला. तसेच भारताचे पंतप्रधान मोदी जगभरात सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे यावेळी पंतप्रधान मेलोनी म्हणाल्या. दरम्यान, रायसेना डॉयलॉगमध्ये बोलताना इटलीच्या पंतप्रधानांनी प्रत्येक देश दिपस्तंभाचे काम करू शकतो, असा दावा केला.

आपल्या देशाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व ओळख यांचा विसर पडावा, असे इतर देशांना वाटत असले तरी, तरी आपले मूळ विसरून चालणार नाही. आपली ओळख अशारितीने पुसून टाकता येणार नाही, असे लक्षवेधी उद्गार पंतप्रधान मेलोनी यांनी रायसेना डायलॉगमधील आपल्या भाषणात काढले. प्रखर राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या आक्रमक नेत्या अशी जॉर्जिआ मेलोनी यांची ओळख असून याच कारणामुळे युरोपातील उदारमतवादी नेते व संघटना त्यांना विरोध करीत आहेत. मात्र आपल्या देशाच्या हितसंबंधांना सर्वाधिक महत्त्व देणार असल्याचे सांगून मेलोनी यांनी आपल्यावरील टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले होते.

रायसेना डायलॉगमध्ये बोलताना देखील एखाद्या देशाच्या साधनसंपत्तीचा वापर आधी त्या देशाच्या समृद्धीसाठीच व्हायला हवा, असे ठासून सांगितले. स्पष्टपणे उल्लेख केला नसला तरी इतर देशांमधून युरोपातील विकसित देशांमध्ये धडकणाऱ्या निर्वासितांच्या लोंढ्यांविरोधात जॉर्जिया मेलोनी यांनी ही विधाने केल्याचे दिसत आहे. काही युरोपिय देशांनी निर्वासितांसाठी आपले दरवाजे खुले करून त्यांच्यासाठी आपली साधनसंपत्ती वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण देशाच्या साधनसंपत्तीवर सर्वप्रथम त्या देशांच्या नागरिकांचा अधिकार असल्याचे सांगून मेलोनी यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडल्याचे दिसते आहे.

leave a reply