रशियाने ‘झिरकॉन’ हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीला वेग दिला

मॉस्को – रशियाने शत्रूच्या ‘मिसाईल डिफेन्स’ यंत्रणेला चकवा देणार्‍या ‘झिरकॉन’ या हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या निर्मिती वेग दिला आहे. रशियाची सरकारी वृत्तसंस्था ‘तास’ने हे वृत्त दिले. या क्षेपणास्त्राच्या सर्व चाचण्या पूर्ण होण्यापूर्वीच निर्मिती सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे या बातमीत सांगण्यात आले. गेल्या काही दिवसात रशिया व पाश्‍चात्य देशांमधील तणाव टोकाला गेला आहे. या पार्श्‍वभूमीवर रशियाने आपल्या प्रगत हायपसोनिक क्षेपणास्त्राची पूर्ण क्षमतेने निर्मिती सुरू करणे लक्षवेधी बाब ठरते.

रशियाने ‘झिरकॉन’ हायपरसोनिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीला वेग दिलारशियाने गेल्या काही वर्षात हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या निर्मितीवर भर दिला असून आतापर्यंत दोन हायपरसोनिक क्षेपणास्त्रे संरक्षणदलात सामीलही करण्यात आली आहेत. ‘झिरकॉन’ हे सर्वात प्रगत हायपसोनिक क्षेपणास्त्र असून त्याचा वेग प्रति तास १० हजार किलोमीटर्सहून अधिक आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी या क्षेपणास्त्राची खास प्रशंसा करताना ते शत्रूच्या सर्व यंत्रणांना चकवा देणारे असेल, असे म्हटले होते. काही महिन्यांपूर्वी पुतिन यांनी ‘झिरकॉन’ पुढील वर्षी रशियन युद्धनौकांवर तैनात होईल, असे जाहीर केले होते.

काही दिवसांपूर्वीच रशियन विनाशिकेवरून ‘झिरकॉन’ची चाचणीही पार पडली होती. मात्र त्यावेळी त्याच्या निर्मितीसंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे अचानक त्याच्या निर्मितीबाबतची रशियन वृत्तसंस्थेने दिलेली माहिती म्हणजे रशियाने आपल्या विरोधक देशांना दिलेला इशारा ठरतो. रशिया युक्रेनवर आक्रमण करणार असल्याचे दावे समोर येत असतानाच, या हायपरसोनिक क्षेपणास्त्राची निर्मिती वाढवून रशियाने पाश्‍चात्य देशांच्या चिंता वाढविल्या आहेत.

leave a reply