जपान ऑस्ट्रेलियाच्या आण्विक पाणबुडीचे स्वागत करील

- जपानच्या राजदूतांची घोषणा

आण्विक पाणबुडीकॅनबेरा – आज जी स्थिती युक्रेनमध्ये आहे, तशीच स्थिती उद्या पूर्व आशियामध्ये उद्भवू शकते. अत्यंत घातक शेजारी देशाकडून जपानला सर्वाधिक धोका संभवतो’, अशा नेमक्या शब्दात जपानचे ऑस्ट्रेलियातील राजदूत शिंगो यामागामी यांनी थेट उल्लेख न करता चीनपासून जपानला असलेल्या धोक्याची जाणीव करून दिली. अशा परिस्थितीत, आण्विक पाणबुडी या धोक्याला तोंड देण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरेल, या जपानच्या पंतप्र्रधान फुमिओ किशिदा यांच्या उद्गारांचा पुनरूच्चार जपानच्या राजदूतांनी केला.

‘ॲडव्हन्सिग ऑकस’ या ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येथे पार पडलेल्या परिषदेत राजदूत यामागामी बोलत होते. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया यांनी ऑकस संघटन स्थापन केले असून यात जपानचाही सहभाग होऊ शकतो, असे दावे केले जातात. मात्र त्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाला अमेरिकेकडून मिळणाऱ्या आण्विक पाणबुडीचे आपल्या बंदरात स्वागत करण्यासाठी जपान सज्ज असल्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण विधान राजदूत यामागामी यांनी केले.

तैवानच्या सागरी व हवाई हद्दीत चीनची जहाजे व लढाऊ विमाने घुसखोरी करीत असताना, तैवानपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या जपानच्या किनारपट्टीला चीनपासून असलेला धोका अधिकच वाढला आहे. म्हणूनच चीनचे तैवानवरील आक्रमण म्हणजे जपानवरील हल्ला ठरेल, असा इशारा जपानमधून दिला जातो. त्या पार्श्वभूमीवर, जपानच्या राजदूतांनी ऑस्ट्रेलियाच्या आण्विक पाणबुडीचे जपानच्या बंदरात स्वागत करण्याची तयारी दाखविली आहे.

leave a reply