जपानच्या संरक्षणमंत्र्यांची ब्रिटनच्या विमानवाहू युद्धनौकेला भेट

टोकिओ/लंडन – जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी सोमवारी ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ला भेट दिली. ब्रिटीश विमानवाहू युद्धनौका सध्या जपान दौर्‍यावर आहे. सोमवारी प्रथमच ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ने जपानच्या योकोसुका बंदराला भेट दिली. यावेळी जपानी संरक्षणमंत्र्यांनी चीनच्या वाढत्या धोक्याचा उल्लेख करून युरोपियन देशांनी या क्षेत्राकडे दिलेले लक्ष महत्त्वाचे ठरते, असे म्हंटले आहे.

गेल्या काही वर्षात चीनच्या विस्तारवारी हालचाली वाढल्या असून साऊथ चायना सी, ईस्ट चायना सीसह संपूर्ण पॅसिफिक क्षेत्रावरील प्रभाव वाढविण्यासाठी आक्रमक धोरण राबविण्यात येत आहे. चीनच्या या आक्रमकतेला रोखण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला असून इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकारी देशांसह युरोपातील मित्रदेशांनाही अधिक सक्रिय होण्यासाठी आवाहन केले आहे. त्यानंतर फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन यासारख्या देशांनी इंडो-पॅसिफिकमधील आपल्या हालचाली वाढविण्याचे संकेत दिले आहेत.

या देशांनी त्यासाठी स्वतंत्र धोरणही जाहीर केले असून ‘फ्रीडम ऑफ नेव्हिगेशन’चा मुद्दा पुढे करून संरक्षण तैनातीचे संकेत दिले आहेत. त्याचाच भाग म्हणून सध्या ब्रिटनची विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ इंडो-पॅसिफिक क्षेत्रात असून सोमवारी या विमानवाहू युद्धनौकेने जपानच्या योकोसुका बंदराला भेट दिली. ब्रिटनच्या विमानवाहू युद्धनौकेने जपानच्या बंदराला ‘पोर्ट कॉल’ देण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. बंदराला भेट देण्यापूर्वी ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिका, दक्षिण कोरिया तसेच जपानबरोबर नौदल सराव केल्याची माहितीही समोर आली आहे.

‘चीनच्या राजवटीकडून साऊथ चायना सी व ईस्ट चायना सीमधील यथास्थिती बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युरोपियन देशांनी याची दखल घेतली असून ही बाब महत्त्वाची ठरते. इतर देशांचे लक्ष असल्याने या क्षेत्रात शांतता व स्थैर्य नांदण्यास मदत होईल. ब्रिटनच्या विमानवाहू युद्धनौकेची भेट जपान व ब्रिटनमधील संरक्षण सहकार्य विकसित करण्यात मोलाचा वाटा उचलू शकते’, अशी प्रतिक्रिया जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी दिली. यावेळी जपानमधील ब्रिटनच्या राजदूत ज्युलिआ लॉंगबॉटमही उपस्थित होत्या.

जुलै महिन्यात ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वॉलेस यांच्यासह उच्चस्तरीय शिष्टमंडळाने जपानचा दौरा केला होता. त्यावेळी ब्रिटनने जपानबरोबरील संरक्षण सहकार्य वाढविण्याची घोषणा केली होती. जपानी नौदलाबरोबर केलेले सराव व विमानवाहू युद्धनौका ‘एचएमएस क्वीन एलिझाबेथ’चा पोर्ट कॉल या दोन्ही गोष्टी या वाढत्या सहकार्याचाच भाग मानला जातो.

leave a reply