भारत आणि फ्रान्सच्या नौदलाचा संयुक्त युद्धसराव

नवी दिल्ली – अरबी समुद्रात भारत व फ्रान्सच्या नौदलाचा ‘वरुण-२०२१’ युद्धसराव सुरू झाला आहे. दरवर्षी दोन्ही देशांच्या नौदलाकडून संयुक्त युद्धसरावाचे आयोजन केले जाते व हे या युद्धसरावाचे १९ वे वर्ष आहे. या सरावात हवाई सुरक्षा, पाणबुडीविरोधी युद्धतंत्राचा समावेश असेल. याच्या आधी फ्रेंच नौदलाने ऑस्ट्रेलियन नौदलाबरोबर युद्धसराव केला होता. पुढच्या कालात फ्रान्सचे नौदल जपानच्या नौदलासोबत सराव करणार आहे. यामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील आपला प्रभाव फ्र्रान्स जाणीवपूर्वक वाढवित असल्याचे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

काही दिवसांपूर्वी फ्रान्स क्वाड देशांच्या नौदलासह बंगालच्या उपसागरात आपला ‘ला पेरूस’ हा युद्धसराव केला होता. त्यानंतर आता फ्रान्सची विमानवाहू युद्धनौका ‘चार्ल्स-दे-गॉल’ युद्धनौका ‘रफायल-एम’ लढाऊ विमानांसह भारतीय नौदलाबरोबर युद्धसराव करीत आहे. ‘वरूण-२०२१’ नावाच्या या युद्धसरावात भारताची ‘आयएनएस कोलकता’, गायडेड क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली ‘आयएनएस तरकश’ व ‘आयएनएस तलवार’ या विनाशिका व चेतक हेलिकॉप्टर्स सहभागी झाल्या आहेत. रविवारपासून सुरू झालेला हा युद्धसराव तीन दिवसांचा असेल. यामुळे भारत व फ्रान्सच्या नौदलाचे सहकार्य अधिकच व्यापक बनणार असून उभय देशांच्या नौदलांमधील समन्वय यामुळे अधिकच वाढेल.

गेल्या काही महिन्यांपासून फ्रान्सने इंडो-पॅसिफिक क्षेत्राकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या क्षेत्रात फ्रान्सची बेटे असून या क्षेत्रात दहा लाख फ्रेंचांची वस्ती आहे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर असल्याचे सांगून फ्रान्स सदर क्षेत्रातील आपला प्रभाव वाढवत आहे. या आघाडीवर फ्रान्सला भारताकडून फार मोठे सहकार्य अपेक्षित आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात संपूर्ण सुरक्षा पुरविणारा विश्‍वासार्ह देश म्हणून फ्रान्स भारताकडे पाहतो, असे फ्रान्सचे रिअर ऍडमिरल फेयॉर्ड यांनी नुकतेच म्हटले होते. भारत आणि फ्रान्समधील हे सहकार्य चीनचा विस्तारवाद डोळ्यासमोर ठेवून विकसित करण्यात येत आहे.

भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया या क्वाड देशांबरोबर आपल्या नौदलाचे सहकार्य विकसित करण्यासाठी फ्रान्स उत्सुकता दाखवित आहे. त्यामुळे लवकरच क्वाडचे रुपांतर क्वाड प्लसमध्ये होईल आणि यात फ्रान्सही सहभागी होईल, असे दावे केले जातात. यासाठी फ्रान्सने हालचाली सुरू केल्या आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वाहतुकीच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासाठी फ्रान्सच्या नौदलाने या क्षेत्रात गस्त सुरू केली आहे.

म्हणूनच भारताचे फ्रान्सबरोबरील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरू लागले आहे. भारताबरोबरच जपान व ऑस्ट्रेलिया या क्वाडचे सदस्य असलेल्या देशांबरोबर देखील फ्रान्स सातत्याने युद्धसराव करीत असून यामुळे चीनच्या विस्तारवादी धोरणाविरोधात नवी त्रिपक्षीय आघाडी समोर येत असल्याचे संकेत मिळत आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी क्वाडसाठी पुढाकार घेऊन पहिल्यांदाच क्वाड देशांच्या प्रमुखांची ऑनलाईन बैठक आयोजित केली होती. पण प्रत्यक्षात राष्ट्राध्यक्ष बायडेन चीनच्या विरोधात ठोस निर्णय?घेऊन क्वाडला चालना देणार नाहीत, अशी चिंता काही विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर इंडो-पॅसिफिक क्षेत्रात फ्रान्ससारख्या प्रभावशाली देशाची गुंतवणूक वाढत आहे, ही लक्षणीय बाब ठरते.

leave a reply